कर्व्यांचा वारसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे. समाजसुधारणेची परंपरा आजोबा धोंडो केशव कर्व्यांपासून सुरू झालेली. समाजकारण, साहित्य आणि आता विज्ञान त्यांच्या घरी नांदते आहे.

aमध्यंतरी ठाण्याला भरलेल्या 38व्या अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. आनंद कर्वे यांच्याशी पहिल्यांदा भेटण्याचा योग आला. अत्यंत मितभाषी तरीही मिष्कील व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. आनंद कर्वे यांच्या रेडीओ आत्मकथनाच्या ध्वनिमुद्रणानिमित्त. त्यानंतर बरेचदा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. चित्पावन ब्राह्मणांचा इतिहास हा माझ्या अभ्यासाचा नाही तर किमान चिंतनाचा विषय आहे. असे सांगताना डॉ. कर्वे एकदा पुढे म्हणाले, ‘माझी आई प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे आणि वडील प्रा.दिनकर धों. कर्वे या दोहोंचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नातू असलेले डॉ. कर्वे अर्थातच संपूर्ण घराण्याच्या वेगळय़ा वाटेने जाणं काही आश्चर्याचं नव्हतं.

1936 साली पुण्यात माझा जन्म झाला. घरातील वातावरण हे अत्यंत आधुनिक होतं. माझ्या दोन्ही बहिणी जाई निमकर आणि गौरी देशपांडे आणि मी तिघांनाही आपल्या वाटा निवडण्याचं आणि त्यानुरूप जगण्याचं स्वातंत्र्य होतं. अर्थात या सर्व गोष्टींची जबाबदारीदेखील उचलणं भाग होतं. तसा नियमच होता. म्हणून मला आवडीच्या म्हणजे समुचित तंत्रज्ञान क्षेत्रात ऍप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर काम केल्यामुळे म्हणावंसं वाटतं की आमच्या तीन पिढय़ा आणि आता चौथी पिढीदेखील माझी मुलगी प्रियदर्शिनी कर्वे ऍप्रोप्रिएट विषयांवर काम करत आल्या आहेत. 1880 साली महर्षी कर्वे यांनी विधवा पुनर्वसन आणि स्त्री शिक्षणाची कास धरली हे त्या काळातील समुचित कर्वे. 1940 साली आनंद कर्वेंचे काका रघुनाथ धोंडो कर्वे यांनी विल्सन कॉलेजातली गणिताची प्राध्यापकी सोडून कुटुंब नियोजनाच्या कामास प्राधान्य दिले. हे त्या काळातील समुचित कर्वे होत. 1970 पासून आनंद कर्वे हे सध्याचा काळ अर्थातच विज्ञान – तंत्रज्ञानाचा असल्यामुळे समुचित तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. प्रत्येकाची क्षेत्रं निरनिराळी, पण त्या त्या काळाला योग्य ते काम हे कर्वे लोक करीत आले आहेत.

उसाच्या पाचटापासून इंधन बनविण्याची प्रक्रिया डॉ. आनंद कर्वे यांनी शोधून काढली. याविषयी ते म्हणतात, या प्रकल्पात वर्षाला 450 कोटी रुपये निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱयांना नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि शहरी भागातील गरीबांना स्वस्त आणि प्रदूषण न करणारं इंधन मिळू शकतं. उसाचं पाचट, आंब्याची पानं, गव्हाचे काड यासारखं जैवभार शेतकरी एरवी जाळून टाकतात. त्यापासून स्वयंपाकाचं इंधन बनविण्याचा प्रयोग डॉ. कर्वे यांनी फलटणच्या ‘आरती’मध्ये (ऍप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी संस्थेत) केला. डॉ. कर्वे 1966 पासून शेती क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी स्वतः उसाची शेती केलीय. ते म्हणत, ‘‘शेतीमधील टाकाऊ माल वाया घालविला जातो. अन्य क्षेत्रांतील टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. तसे शेतीत करता येतं का हा विचार मला नेहमी पडत असे, नव्हे पिडत असे. त्यामधून पुढे हा प्रकल्प आकाराला आला.’’ त्यानंतर त्यांनी ही संपूर्ण प्रक्रियाही विशद केली ती जागेअभावी या ठिकाणी लिहिणं शक्य नाही. संस्थेशी संपर्क करून ती समजावून घेता येईल.

डॉ. आनंद कर्वे नेहमी प्रत्यक्ष प्रयोग करून उपाय शोधून मगच इतरांना सांगण्यावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, ‘‘शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करून ती रोपं इतरांना विकली तर शेतकऱयाला शेतीतून मिळणाऱया फायद्यापेक्षा अधिक नफा मिळतो आणि रोपवाटिकेला लागणारी जागा आणि मेहनत शेतीच्या तुलनेत किरकोळ असते.’’ शेतकऱयाला उपयुक्त असे रोपवाटिकांचे तंत्र डॉ. कर्वेंनी विकसित केले. महाराष्ट्रात सर्वत्र नाव मिळविलेल्या लक्ष्मी चुलीसारखी चूल बनवून तिला आतून भाजलेल्या मातीचा लेप दिल्यानं तिचं आयुष्य वाढलं. दोन तोंडाची चूल बनवून मुख्य तोंडावर स्वयंपाक आणि (दुसरं तोंड) केक, बिस्किटं, नानकटाई भाजता येतात. लक्ष्मी चूल लोखंडी पत्रे वापरून केल्यावर ती दीर्घ काळ टिकणारी झाली. याशिवाय बांबू आणि प्लॅस्टिक शीटच्या सहाय्याने बनवलेल्या, पावसाचं पाणी साठवण्याच्या टाक्या, बांबूच्या हातगाडय़ा, टिश्यू कल्चर असे अनेक प्रकल्प आरती संस्थेतर्फे डॉ. आनंद कर्वे घेतात.

जे. जी. काणे पारितोषिक, डॉ. बी. डी. टिळक पुरस्कार आणि अमेरिकन सरकारच्या कृषी विभागाचे प्रमाणपत्र लाभलेले डॉ. आनंद कर्वे अविरत काम करतच आहेत. कारण त्यांच्या मते कामात बदल आणि नवीन काम हीच खरी विश्रांती. तरुणांना यापेक्षा योग्य संदेश तो कोणता?

[email protected]