
सामना प्रतिनिधी, नांदेड
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ 5 मे रोजी होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नांदेड शहरात बरीच आहे. या परीक्षेमध्ये चुकीचे उत्तर दिल्यास गुण कमी होतात म्हणजेच या परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धती वापरली जाते. या पद्धतीमुळे एक उत्तर जरी चुकलं तरी विद्यार्थी ही परीक्षा नापास होऊ शकतात. ही बाब हेरून विद्यार्थ्यांना गंडवणारी एक टोळी नांदेडमध्ये सक्रीय झाली आहे. ही टोळी विद्यार्थ्यांना प्रश्न चुकला आणि गुण कमी झाले असले तरी काही फरक पडणार नाही आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर करून देतो आणि गुण वाढवून देतो असं आमीष दाखवत आहे.
दै.सामनाने असं खरोखर करता येतं का ? नीटसारख्या राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेमध्ये असे गुण बदलता येतात का ? याबाबत नांदेडच्या ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीचे संचालक गणेश तिडके-पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आमच्याशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले असे मार्क वाढवणं, कमी करणं अजिबात शक्य नाहीये. एकदा सोडविलेला प्रश्न पुन्हा दुरूस्त करण्याची कोणतीही मुभा नीट परीक्षेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवतानाच अचूक सोडवावेत असं तिडके-पाटील यांनी सांगितले. सोडविलेला प्रश्न दुरुस्त करण्याचे आमीष कुणी दाखवत असेल तर त्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे असंही ते म्हणाले आहेत. या भामट्यांकडे विद्यार्थ्यांनी कोणतीही कागदपत्रे, ओएमआर शीट, नोंदणी शुल्क जमा करू नये कारण असं करणाऱ्या विद्यार्थ्याची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे असंही तिडके-पाटील यांनी सांगितले.
































































