हिममानव आभास की वास्तव?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

हिंदुस्थानी सैन्याच्या एका गिर्यारोहण पथकाने माऊंट मकालूवरील चढाई दरम्यान हिममानवाच्या पाऊलखुणा आढळून आल्याचे ट्विट फोटोंसह गेल्या आठवडय़ात सोशल मीडियावर जाहीर केल्याने त्यावर उलटसुलट क्रिया-प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सैन्याला ट्रोलदेखील केले गेले. हे सर्व अशास्त्रीय असल्याचे दाखले दिले गेले. हिंदुस्थानी लष्कर मागील सात दशके हिमालयात गिर्यारोहणाचा सराव करीत आहे. मात्र अशा प्रकारच्या विशाल गूढ मानवाच्या (मिस्टीरियस मॉन्स्टर) फंदात ती याआधी कधीच पडली नव्हती. पण यावेळी पहिल्यांदाच सैन्य पथकाने अशा प्रकारचे जाहीर केले. अर्थात सर्व फोटो आणि व्हिडीओ शास्त्रज्ञांना दिले आहेत अस सैन्याने स्पष्ट केले आहे. शेवटी हिममानव हा आभास आहे की वास्तव आहे हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. तोपर्यंत आपापल्या परीने या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवावे.

हिंदुस्थानी सेनेच्या 18 सैनिकांचे गिर्यारोहण पथक मार्च ते मे महिन्यात त्यांच्या हिमालयन मोहिमेअंतर्गत 8हजार मीटर्स (27,247 फूट) उंच, माऊंट मकालूवर चढाई करेल’ या अर्थाचे एक प्रसिद्धी पत्रक हिंदुस्थानी सैन्याच्या मुख्यालयाने 26 मार्च 2019 ला जारी केले होते. बर्फाच्छादित पर्वतराजींवरील अतिदूर पल्ल्यांची भ्रमंती (लॉन्ग रेंज पेट्रोल) हा सैन्याच्या सामरिक प्रशिक्षणाचा भाग असतो. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी हे गिर्यारोहक पथक आपल्या मिशनवर रवाना झाले. मकालू शिखर नेपाळ आणि तिबेटच्या मध्यात आहे.

अशा मिशनदरम्यान मिशन प्रमुखांनी रोज सकाळ-संध्याकाळ सैन्याच्या मुख्यालयाला ‘सिच्युएशन रिपोर्ट’ पाठवणे बंधनकारक असते. माऊंट मकालुवरील चढाई करणाऱ्या मिशनचा प्रमुखदेखील या पद्धतीने रोज मुख्यालयाला रिपोर्ट करीत असे. मंगळवार 30 एप्रिल 19 ला सैन्याच्या ऑडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फर्मेशनने ‘फॉर द फर्स्ट टाईम, इंडियन आर्मी माऊंटेनियरिंग एक्सपीडिशन हॅज सायटेड मिस्टीरियल फूट प्रिंटस् ऑफ मिथिकल बिस्ट यती. धिस इल्युझिव्ह स्नोमॅन हॅज ओन्ली बिन सायटेड ऍट मकालू बारून नॅशनल पार्क इन द पास्ट’ असे ट्विट करून त्या पाऊलखुणांचे तीन आणि त्या एक्सपीडिशन पथकाचा एक असे चार फोटो सोशल मीडियावर टाकले. प्रत्येक पाऊलखुण 32×15 इंचाची (81×38 सेंटिमीटर होती. या मिशनला या पाऊलखुणा 9 एप्रिलला मकालू बेसकॅम्पजवळ पाहायला मिळाल्या. त्याच दिवशी त्यांनी त्या पाऊलखुणांचे फोटो/व्हिडिओज सैन्य मुख्यालयाला सिच्युएशन रिपोर्टद्वारे पाठवले. सामान्य मानवाच्या पायाची लांबी कमाल 15 पूर्णांक 78 इंच आणि रुंदी 5 इंच असते. गोरिल्ला/एपचा पाय 18-20 इंच लांब व 6-7 इंच रुंद असो. या मापकामुळे सैन्याने त्यांना दिसलेल्या पाऊलखुणा यतीच्या (हिममानव) आहे असं वाटून त्यांनी त्या जाहीर केल्या असाव्यात.

ज्या यतीला नेपाळी लोकसंगीतात (फोक साँग) ‘आपादमस्तक केसाळ वानर’ किंवा ‘केसाळ हिममानव’ म्हणतात त्याला पाश्चिमात्य देश हिमालयातील ‘हिममानवः अबोमिनेबल स्नोमॅन’ किंवा ‘यती’ या नावाने संबोधतात. सर्वसाधारण मानवापेक्षा बराच मोठा असणारा हा प्राणी हिमालयन पर्वतराजी, सैबेरिया आणि मध्य तसेच पूर्व आशियाच्या पर्वतराजींमध्येच वास्तव्य करतो अशी वदंता आहे. मात्र हा खरेच अस्तित्वात आहे का, याबद्दल जनमानस आणि शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. तथापि ब्रिटिश पर्यावरणवादी सर डेव्हिड ऍटेनबरो यांनादेखील या हिममानवाने भुरळ घातली होती.

वास्तविक 2011 मध्ये नेपाळमध्ये सापडलेले तथाकथित यतीचे बोट म्हणजे मानवी हाडाचा तुकडा असल्याचे एका जेनेटिक तज्ञाने सांगितले होते. 2014 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञांनीदेखील तथाकथित हिमालयन यतीच्या केसांच्या 30 नमुन्यांची चाचणी घेतली होती. मात्र ते पॅलिओलिथिक पोलर बिअरचे (एक अस्वल) केस निघाले. हिमालयन यतीचे केस, हाडांचे तुकडे, कातडीचे तुकडे आणि विष्ठेच्या 24 नमुन्यांची डीएनए चाचणी 2017 मध्ये करण्यात आली होती. शार्लोट लिंडक्विस्ट यांच्या फ्रेंच पथकाने ही चाचणी केली होती. केस, कातडी व विष्ठेचे नमुने हिमालयातील काळय़ा आणि राखाडी अस्वलांचे, दाताचा तुकडा हिमश्वानाचा (स्नो डॉग्स) आढळला. तसेच एका स्थानिक बौद्ध मंदिरात (मोनस्टरी) ठेवलेला यतीचा पंजा (पॉ) प्रत्यक्षात काळ्या अस्वलाचा असल्याचे समोर आले तर हाडे तिबेटीयन तपकिरी रंगाच्या अस्वलाची निघाली.

जवळपास 350 वर्षांपूर्वी यती/हिममानवबद्दलच्या दंतकथांची सुरुवात झाली. असे म्हणतात की, त्या काळी सांगवा दोरजे नावाचा नेपाळी साधू, दुर्गम आणि अत्यंत उंच पहाडांवरील पांगबोचे गावाजवळच्या गुहेत राहायला गेला. कारण तेथून त्याला कैलास शिखराचं (एव्हरेस्ट पर्वत) सहजसुलभ, स्पष्ट दर्शन होत असे. तेथे राहण्यासाठी त्याला यती मदत करीत असत. त्या साधूने त्यातील एका मृत यतीचे अवशेष (रेलिक्स) सांभाळून ठेवले होते असे स्थानिक लोकगीतांमधून प्रत्ययाला येते. नेपाळी व तिबेटियन भाषेत यतीला मेह तेह (अस्वली मानव) आणि कांग मी (हिममानव) हे नामाभिधान देण्यात आले आहे. यतीचे डोके चौकोनी असून त्याचे केस तांबडे असतात आणि तो शिट्टीसारखा कर्कश्श आवाज काढतो अशी वदंता आहे. तिबेटियन भाषेत यतीला मिशे (मॅन बिअर), डझुतेह (कॅटल बिअर), मिगोई (वाईल्ड मन) आणि बून मानछी (जंगल मॅन) असेदेखील म्हटले जाते. त्यांच्यानुसार यती हा दोन पायांचा 15-20 फूट उंचीचा, वानरासारखा प्राणी (एप लाईक ऑनिमल) असतो. हिंदुस्थानी सैन्याच्या गिर्यारोहक पथकाने 9 एप्रिल रोजी घेतलेले/काढलेले बर्फातील पाऊलखुणांचे फोटो नेमके कसले आहेत हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. तथापि ते एवढे मोठे आहेत की ते मानवेतर पण मानवसदृष्य प्राण्याचे म्हणजेच हिममानव किंवा यतीचे असावेत याबद्दल शंका घ्यायला जागा कमी आहे.

हिंदुस्थानी लष्कर मागील सात दशके हिमालयात गिर्यारोहणाचा सराव करीत आहे. मात्र अशा प्रकारच्या विशाल गूढ मानवाच्या (मिस्टीरियस मॉन्स्टर) फंदात ती याआधी कधीच पडली नव्हती. पण यावेळी पहिल्यांदाच सैन्य पथकाने अशा प्रकारचे जाहीर केले आहे. यामुळे सोशल मीडियामधील ‘यतीप्रेमीं’मध्ये उत्सुकतेची जशी लाट आली तशी त्याची टिंगलही केली गेली. या ट्विटच्यानंतर 36 तासांमध्ये सुमारे सहा लाखांवर लाईक्स, डिसलाईक्स, कॉमेंटस्, ट्रोलिंग बघायला मिळाले. यापैकी काही प्रतिक्रियांमधे भूतकाळात झालेल्या शास्त्रीय चाचण्यांचा उल्लेख होता. हे फोटो ट्विटरवर टाकण्याआधी हिंदुस्थानी सैन्याने त्या पाऊलखुणा भूतकालीन फोटोंच्या प्रमेयांशी मेळ खात असल्याची खात्री केली आणि मगच ते जनसामान्यांसाठी जाहीर केले. सैन्याने सांगितले की, या घटनेचे फोटोग्राफिक इव्हिडन्सेस आणि व्हिडीयोज शास्त्रज्ञांना देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर ही कारवाई आम्ही सामान्य लोकांच्या ज्ञानात भर पडावी आणि ‘टू एक्साईट सायंटिफीक टेंपर्स रीकिंडल द इंटरेस्ट’साठी केली असा खुलासा केला आहे. अर्थात हिंदुस्थानी सैन्याने हे फोटो प्रसिद्ध केल्यामुळे अनेकांचा पोटशूळ उठला आहे. शेवटी हिममानव हा आभास आहे कि वास्तव आहे हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. तोपर्यंत आपापल्या परीने या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवावे.

1920-21 मध्ये चार्ल्स हॉवर्ड बरी या ब्रिटिश गिर्यारोहकांने तिबेटच्या ल्हाकपाला या खिंडीजवळ यतीच्या पाऊलखुणांचे फोटो काढून 1921 च्या त्याच्या ‘माऊंट एव्हरेस्टः रेकॉनिसन्स 1921’ या पुस्तकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतरच पाश्चिमात्य देशांमधे यतीबद्दलच्या उत्सुकतेला उधाण आले. आपल्या पुस्तकात चार्ल्स म्हणतो ‘आय फाऊंड इंप्रिंटस् ऑफ ह्युमन लाइक फूट अमंग्स्ट फुट स्टेप्स ऑफ ऑनिमल्स ऍण्ड लॅटर गॉट टू नो अबाऊट द लिजण्ड ऑफ ए रेस ऑफ वाईल्ड हेअरी मॅन लिव्हिंग इन द वाईल्डेस्ट ऍण्ड मोस्ट इनएक्सेसिबल माऊंटन्स ऑफ हिमालयाज’.
एन ए टॉम्बझी या ग्रीक/इटालियन जिऑलॉजिस्टने यतीला दोनशे-तीनशे मीटर एवढय़ा कमी अंतरावरून पाहिल्याचे 1925 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘फोटोग्राफिक एक्सपीडिशन टू सदर्न ग्लेशियर्स ऑफ कांचनजंगा’ या पुस्तकात म्हटले आहे.
1951 मध्ये एरीक शिपटन आणि मायकेल वर्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी मानव विरहित प्राण्यांमधील श्रेष्ठ जात असे मानलेल्या विशाल मानवाच्या पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध केले.
1960 मध्ये एव्हरेस्ट विजेता सर एडमंड हिलरी आणि जॉन हँट यांनी एव्हरेस्टवर स्वारी करताना एका तथाकथित यतीचे शीर आणले होते, पण नंतर ते हिम बकऱ्यासारख्या (स्नो गोट) प्राण्याचे आहे हे सिद्ध झाले.
1986 मध्ये रेन्होल्ड मेसर्न या गिर्यारोहकाने ‘अबोमीनेबल हिस्टरी’ या पुस्तकात यतीच्या पावलांचे अगदी ताजे ठसे पाहिल्याचे नमूद केले आहे.
2010 मध्ये चिनी लोकांनी तिबेटमधे एक चार पायांचा यती पकडल्याचे जाहीर केले, पण शेवटी तोदेखील चार पायांचा ठिपक्या मांजराच्या जातीचा प्राणी निघाला.
यती अथवा हिममानवाचा उल्लेख कथा कादंबऱ्या, चलचित्रपट, गाणी आणि खेळांमध्येदेखील उल्लेख दिसतो. पण शास्त्रज्ञ मात्र अजूनही या पाऊलखुणांच्या ठशांना/फोटोंना (सायटिंग/इव्हिडन्स) ‘ते विशाल अस्वलाचे आहेत’ असेच मानत असत.

[email protected]