आज दिवसभर ढगाळ वातावरण, हलक्या पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने प्रचंड हैराण झालेल्या मुंबईकरांचा संडे दिलासा देणारा ठरणार आहे. सुट्टीचा दिवस, ढगाळ वातावरण आणि मस्त कुठतेरी फिरायला जाण्याचा प्लॅन… त्यामुळे हा दिवस फन डे होणार आहे. कारण आज मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहील. तसेच मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे आधीच उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना बाहेर कसे पडावे याची चिंता आहे, परंतु वातावरण ढगाळ राहणार असल्याने उकाड्यापासून थोडासा तरी दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून तापमान पुन्हा 45 अंशांच्या वर जाईल असेही म्हटले आहे.

म्हणून मुंबईत पाऊस
गुजरातपासून कोकण आणि गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’चे महेश पलावत यांनी सांगितले.

यामुळे उष्णतेची लाट
ओडिशात ‘फनी’ चक्रीवादळ आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात किंचीत घट झाली होती, परंतु हे वादळ आता बांगलादेशच्या दिशेने सरकले असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे पुन्हा उष्णतेची लाट तयार झाली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या मार्गाने उष्ण वारे विदर्भ आणि मराठवाड्यात दाखल झाल्यामुळे येथे पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

  • नागपूरसह विदर्भात येत्या तीन दिवसांत उष्णतेची लाट येणार असून हवामान खात्याने ‘ऑरेंज ऍलर्ट’चा इशारा दिला आहे.
  • सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिह्यातील ब्रह्मपुरी येथे 45.5 अंश सेल्सिअस तर चंद्रपूर येथे 45 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली.
  • मुंबईत 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शहर – तापमान
अकोला 42 अंश सेल्सिअस
अमरावती 42.8 अंश सेल्सिअस
बुलढाणा 38.77 अंश सेल्सिअस
ब्रह्मपुरी 45.5 अंश सेल्सिअस
चंद्रपूर 45 अंश सेल्सिअस
गडचिरोली 43.2 अंश सेल्सिअस
गोंदिया 41 अंश सेल्सिअस
नागपूर 43.3 अंश सेल्सिअस
वर्धा 44.1 अंश सेल्सिअस
वाशीम 40.2 अंश सेल्सिअस
यवतमाळ 41.5 अंश सेल्सिअस

  • दोन दिवस तापमान कमी झाले असले तरी येत्या तीन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट मोठय़ा प्रमाणात येणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तापमानाचा पारा 47 अंशांच्या पलीकडे जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
  • हवामान खात्याने यासंदर्भात एक ‘ऑरेंज ऍलर्ट’ जारी केला आहे. यात नागरिकांना तापमानाच्या आणखी तीव्र लाटेसाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच पुरेशी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.