धामापूर तलाव गाळाने भरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

तालुक्यातील धामापूर तलावातून गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. मात्र तलावातील गाळ अनेक वर्षे काढला गेला नाही. पूर्वी गाळ काढल्याची प्रशासकीय नोंदही नाही. भविष्यात पाण्याची मोठी मागणी व गरज लक्षात घेता तलावातील पाण्याच्या साठ्यात वाढ होण्यासाठी गाळाचा प्राधान्याने उपसा व्हायला हवा. असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडले यांनी मालवण येथे व्यक्त केले.

मालवण शहर व परिसरातील गावांची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामापूर तलावातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जलतज्ज्ञांच्या पथकाने धामापूर तसेच कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावाची पाहणी केली. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडले, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे श्रीधर पेडणेकर, बिर्ला महाविद्यालय कल्याणचे प्रा. कपिल अष्टेकर, महंमद शेख, प्रा. निखिल गवई, ओंकार केणी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, आवेक्षक सुधाकर पाटकर, नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, आप्पा लुडबे, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान श्री. मुंडले म्हणाले, धामापूर तलाव हा शिवकालीन आहे. गेली कित्येक वर्षे या तलावातील गाळ काढला गेल्याची प्रशासकीय नोंद नाही. तलाव 70 ते 80 फूट खोल असल्याने गाळ काढणे अत्यावश्यक आहे. जिथे पाण्याचे साठे उपलब्ध आहेत व जिथे पाण्याची गळती आहे तेथील डागडुजी प्राधान्याने करायला हवी. गाळ काढला गेल्यास पाण्याच्या साठ्यात वाढ होऊ शकते.

डोंगुर्ले तलावातुनही मुबलक पाणीसाठी मिळेल

डोंगुर्ले तलावाच्या पाहणी नंतर मुंडले म्हणाले एप्रिल, मे कालावधीत देखील डोंगुर्ले तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या तलावाची डागडुजी केल्यास कुंभारमाठ परिसरातील ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि धामापूर तलावातील पाण्यावरील भार कमी होईल. कासारटाका येथे बंधारा झाल्यास पाण्याचा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, असेही स्पष्ट केले.