शिरुरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरुरच्या पश्चिम भागात बिबट्यांची दहशत कायम असून आज रविवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घोडा ठार झाला आहे. ही घटना तालुक्यातील कवठे येमाईच्या गणेशनगरमध्ये पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत संबंधित मेंढपाळाचे सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर मागील दोन महिन्यात अनेक पाळीव प्राणी बिबट्याकडून फस्त करण्याच्या घटना घडल्या आहेत.

आंबेगाव तालुक्यातील लाखणगावचे मेंढपाळ नाथा कर्हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मेंढ्या व पाळीव जनावरांसह कवठे येमाई व लगतच्या परिसरात वास्तव्यास आहेत. गणेशनगर जवळील एका शेतात मेंढ्यांचा टाळा व बाजूलाच 3 घोडे बांधण्यात आले होते. त्यांच्यातील एका घोड्यावर बिबट्याने आज पहाटे हल्ला केला. यात घोडा ठार झाला

मागील दोन महिन्यात याच परिसरात बिबट्यानी मोठीच दहशत माजवत अनेक पाळीव कुत्री,बकरे,गाय फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. आजच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन वनविभागाने दिले. तर दुपारी तातडीने लगेचच पिंजरा लावण्यात आला असल्याचे वन विभागाचे हनुमंत कारकूड यांनी सांगितले. लगतच्या शेतात बिबट्यांच्या पायांचे ठसे ही आढळुन आल्याने व जवळच नागरी वस्ती असल्याने नागरिक भयभित झाले आहेत. याबाबत आमच्या कवठे येमाई प्रतिनिधीने केलेल्या पाठपूराव्यास यश आले असून वनविभाने आजच येथे पिंजरा लावल्याने व पिडीत मेंढपाळास योग्य ती शासकीय मदत देण्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.