
अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर
कर्जाने दिलेले पैसे घेण्यासाठी गेलेल्या सावकाराने रागाच्या भरात कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी चंद्रपुरात घडली. यामध्ये मुलगा 30 टक्के तर पत्नी 60 टक्के भाजली आहे. या दोघांवरही स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रपुर इथे सरकार नगरात राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे पेशानं शिक्षक असून, त्यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू याच्याकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतलं होते. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी यापूर्वीच केली असून, उर्वरित रकमेतील 60 हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले होते. ते घेण्यासाठी आज जसबीर भाटीया हरिणखेडे यांच्या घरी गेला. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दीक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरने आपल्या गाडीतून पेट्रोल काढून अचानकपणे पीयूष आणि कल्पना यांच्यावर शिंपडले व पेटवून दिले. यात जसबीरही किरकोळ भाजला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच आरडाओरडा झाला आणि आजूबाजूचे लोक धावत आले व दोघांना वाचवले. दोघांनाही स्थानिक पोद्दार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जसबीर भाटीया हा अवैधरीत्या सावकारी करतो. पैसे देण्याचे कबूल केल्यानंतरही त्याने हा जीवघेणा केल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हरिणखेडे कुटुंबानं व्यक्त केलीय. या घटनेमुळं शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.






























































