
सामना प्रतिनिधी । हिंगोली
चोरीच्या मोटारसायकलची विक्री करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून या दोघांकडील दोन आणि विक्री केलेल्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडारवार यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरामध्ये एक व्यक्ती चोरीच्या मोटारसायकल विकत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडरवार यांना मिळाल्यावर त्यांनी विशेष पथकावर ही कामगिरी सोपविली. कळमनुरी शहराच्या साईनगर भागात जाऊन पोलीस पथकाने चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. कळमनुरी शहराच्या शास्त्रीनगर भागातील आकाश उर्फ बजरंग गजानन व्यवहारे व शेंबाळ पिंपरी येथील गजानन सुर्यवंशी या दोघांनी चोरीच्या मोटारसायकलची विक्री करत असल्याची कबुली पोलीसांसमोर दिली असून आकाशच्या ताब्यातून १ तर गजाननच्या ताब्यातून १ अशा दोन मोटारसायकली जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी सांगितले. यासोबतच या दोघांनी विक्री केलेल्या दहा मोटारसायकली देखील जप्त केल्या असून जप्त मुद्देमालाची किंमत ५ लाख ६० हजार रुपये असल्याचेही ते म्हणाले. मोटारसायलची मुळ कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे या मोटारसायकली चोरीच्या असल्याचे पुढे आल्याचेही पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.





























































