फेंटानिल नावाचे वादळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आशीष बनसोडे

‘फेंटानिल’… आतापर्यंत चर्चेत नसलेले आणि कोणालाही फारसे ठाऊक नसलेले अत्यंत घातक ड्रग्ज. गोळ्या स्वरूपात मिळणारे हे ड्रग्ज प्रचंड घातक असले तरी त्याची नशा हिंदुस्थानात अजून तरी केली जात नाही हे आपले सुदैव आहे; पण अमेरिका, मेक्सिको या देशांमध्ये ‘फेंटानिल’ ड्रग्जने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

हेरॉईन, कोकेन, एमडी यांसारख्या घातक ड्रग्जने आपली पाळेमुळे सर्वत्र अगदी खोलवर पसरवली आहेत. ड्रग्जच्या नशेने तर शालेय विद्यार्थ्यांनादेखील सोडलेले नाही. गरीब असो वा श्रीमंत, कुठल्याही समाजातील तरुण-तरुणी अगदी अलगद ड्रग्जच्या विळख्यात सापडत असल्याचे सध्याचे विदारक चित्र आहे. दिवसागणिक नशा करणाऱयांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. बाजारात चलती असलेल्या हेरॉईन, कोकेन, एमडी, चरस या ड्रग्जची डोकेदुखी कमी की काय, त्यात आता ड्रग्जच्या विश्वात धुमाकूळ घालत असलेल्या ’फेंटानिल’ नावाच्या ड्रग्जचा धोका उभा ठाकला आहे.

‘फेंटानिल’… आतापर्यंत चर्चेत नसलेले आणि कोणालाही फारसे ठाऊक नसलेले अत्यंत घातक ड्रग्ज. गोळ्या स्वरूपात मिळणारे हे ड्रग्ज प्रचंड घातक असले तरी त्याची नशा हिंदुस्थानात अजून तरी केली जात नाही हे आपले सुदैव आहे; पण अमेरिका, मेक्सिको या देशांमध्ये ‘फेंटानिल’ ड्रग्जने अक्षरशŠ धुमाकूळ घातला आहे. पूर्वी हेरॉईन या ड्रग्जला त्या देशांमध्ये जबरदस्त मागणी होती. त्यामुळे हेरॉईनच्या अतिसेवनाने मृत्युमुखी पडणाऱयांची संख्यादेखील तेथे वर्षाला हजारोंच्या घरात होती; पण कुठून तरी अचानक फेंटानिलची एण्ट्री झाली आणि बाकीचे सर्व ड्रग्ज बाजूला पडले. खतरनाक नशा होत असल्यामुळे फेंटानिलची मागणी झपाटय़ाने वाढू लागली. अमेरिका, मेक्सिकोसारख्या देशात फेंटानिलच्या नशेचे प्रमाण इतके वाढले की, त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्यादेखील झपाटय़ाने वाढू लागली. आज तारखेला अमेरिकेतील अवस्था अशी आहे की, प्रत्येक वर्षाला फेंटानिलच्या नशेमुळे मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत वाढच होत असल्याचे आकडेवारी सांगते. म्हणूनच अमेरिकेमध्ये फेंटानिल म्हणजे मृत्यू असे म्हटले जाते.

हिंदुस्थानात अद्याप या ड्रग्जची नशा करण्याचे फॅड आलेले नसले तरी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या डिसेंबर महिन्यात केलेल्या एका मोठय़ा कामगिरीमुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. ड्रग्जविरोधात काम करणाऱया केवळ हिंदुस्थानातीलच नाही, तर परदेशातील तपास यंत्रणादेखील मुंबई पोलिसांनी डिसेंबरमध्ये केलेल्या धडक कारवाईमुळे हलल्या आहेत. 12 डिसेंबर रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, एपीआय प्रशांत मोरे, सचिन कदम व त्यांच्या पथकाने उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या सूचनेनुसार वाकोला येथे कारमधून आलेल्या सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि घनश्याम सरोज या चौघांना पकडले होते. हे चौघे एअर कार्गोतून मेक्सिकोला ड्रग्ज पाठवत असल्याची खबर पोलिसांना होती. त्यानुसार भालेकर व पथकाने त्यांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडे चार छोटे ड्रम भरून 100 किलो पावडर सापडली होती. ती चिंचुक्याची पावडर असल्याचे त्या चौघांचे म्हणणे होते. पण ती पावडर म्हणजे फेंटानिल असणार असा पोलिसांना संशय होता; परंतु नुसता संशय असून चालणारे नव्हते. प्रयोगशाळेत पोलिसांचा संशय खरा की खोटा ते ठरणार होते. ही पावडर गुजरातमधील एका कारखान्यातून भिवंडीत आणून ती मेक्सिकोला पाठवण्यात येणार होती. एक हजार कोटी रुपये किमतीची ती पावडर म्हणजे फेंटानिल असल्याचा पोलिसांनी दावा केल्याने सर्वांच्याच, अगदी जागतिक पातळीवरील तपासयंत्रणांच्यादेखील नजरा प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागून राहिल्या होत्या. अखेर तीन महिन्यांनंतर कलिना येथील प्रयोगशाळेचा अहवाल आला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण एक हजार कोटी रुपयांची ती पावडर म्हणजे फेंटानिल बनविण्यासाठी लागणारा ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’ हा मुख्य घटक असल्याचे स्पष्ट झाले आणि फेंटानिलविरोधात मुंबई पोलिसांनी केलेली ही जगातील सर्वात मोठी कारवाई ठरली.

फेंटानिलने तूर्तास अमेरिका, मेक्सिकोमध्ये धुमाकूळ घातला असला तरी त्याचा धोका हिंदुस्थानलादेखील आहे. आजच्या तारखेला हिंदुस्थानात फेंटानिलची नशा केली जात नाही; पण अमेकितील फेंटानिलचे वादळ हिंदुस्थानात यायला वेळ लागणार नाही. कारण आता मुंबईत ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’ ही पावडर सापडली आहे. ती गुजरातमध्ये बनविण्यात आली होती. भविष्यात या पावडरपासून हिंदुस्थानातच फेंटानिलची निर्मिती सुरू झाली तर सारेच कठीण होऊन बसेल. गेल्या तीन-चार वर्षांत एमडीने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. जर कधी ड्रग्जमाफियांनी फेंटानिलला हिंदुस्थानच्या बाजारात आणले तर काय अवस्था होईल हे अमेरिकेतील भयंकर चित्र पाहून कल्पनाही करता येऊ शकत नाही. त्यामुळे ड्रग्जविरोधात सर्वांनीच आपल्या मुठी आवळणे हीच काळाची गरज आहे; अन्यथा येणारा काळ कठीण आहे.

मुंबई पोलिसांनी ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’ पकडले नसते तर…
मुंबई पोलिसांनी 12 डिसेंबर रोजी ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’ या पावडरचा 100 किलो साठा पकडला नसता तर फार मोठा अनर्थ घडला असता. कारण हा साठा व्हाया मेक्सिकोमार्गे अमेरिकेला पाठविण्यात येणार होता. अमेरिकेमध्ये ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’पासून 3 कोटी 80 लाख फेंटानिलच्या गोळय़ा बनविण्यात येणार होत्या आणि त्याची किंमत 6 हजार 900 कोटी इतकी असती. सुदैवाने ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’चा साठा हिंदुस्थानबाहेर गेला नाही; अन्यथा आधीच डोक्याला हात लावून बसलेल्या अमेरिकेची डोकेदुखी आणखी वाढली असती.

अमेरिकेपेक्षा मोठी कारवाई
यापूर्वी डीआरआयने इंदूरमध्ये फेंटानिलची पावडर पकडली होती; पण त्याचे प्रमाण खूपच कमी होते. तर अमेरिकेने अद्यापपर्यंत केवळ 50 किलो फेंटानिल ड्रग्ज पकडले आहे. त्यापासून 1 कोटी 90 लाख इतक्या फेंटानिलच्या गोळय़ा बनवल्या असत्या तर त्याची किंमत 57 कोटी डॉलर्स इतकी असती. तर मुंबईत पकडलेल्या ‘1 फिनाईल 4 प्रेपीडॉन’च्या साठय़ापासून फेंटानिलच्या गोळय़ा बनल्या असत्या तर त्याची किंमत 1140 लाख डॉलर्स इतकी असती.

फेंटानिल म्हणजे मृत्यू अटळ
फेंटानिलची नशा इतर ड्रग्जच्या तुलनेत जबरदस्त आहे. त्यामुळे हेरॉईन, कोकेन, एमडीला बाजूला सारून नशा करणारे फेंटानिलला प्राधान्य देऊ लागले आहेत; पण इतर ड्रग्जच्या तुलनेत फेंटानिलची नशा नशेबाजांना तितक्याच लवकर मृत्यूच्या जवळ घेऊन जाते. म्हणून अमेरिकेमध्ये इतर ड्रग्जच्या तुलनेत फेंटानिलमुळे मरणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षाला दुपटीने वाढत असल्याचा अमेरिका सरकारचा रिपोर्ट सांगतो.

टॉप 10 घातक ड्रग्ज
1) फेंटानिल 2)हेरॉईन 3)कोकेन 4)मेथाफेटामाईन 5)अफ्राझोलम 6) ऑक्सीकोडन 7) मॉर्फिन 8) मेथाडोन 9)हायड्रोकोडेन 10) डायझेपाम.

[email protected]