चीनमध्ये क्रिकेट का खेळला जात नाही; ‘ही’ आहेत कारणे….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि मूलभूत सुविधांमध्ये चीन जगात अग्रस्थानी आहे. चीन ऑलंपिक खेळांमध्येही आगेकूच करत आहे. मात्र, क्रिकेटजगतात चीन कुठेही दिसत नाही. चीनमध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जात नाही. चीनचा क्रिकेट संघही नाही. तसेच येथील लोकांना क्रिकेट आवडतही नाही. यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे चीन ऑलंपिक खेळांना जास्त महत्त्व देत असून त्यासाठीच खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.

चीनमध्ये ऑलंपिकमधील खेळांना जास्त महत्त्व देण्यात येते. या स्पर्धेत जास्तीतजास्त खेळाडू पाठवण्यावर चीनचा भर असतो. त्यामुळेच ऑलंपिकमध्ये चीनचे प्राबल्य आहे. ऑलंपिकमधील सर्वाधीक पदके चीनमधील खेळाडू जिंकतात. क्रिकेटचा ऑलंपिकमध्ये समावेश नसल्याने चीनमध्ये क्रिकेटला फारसे महत्त्व देण्यात येत नाही. तसेच चीनने इंग्रजांचे अनुकरण कधीही केलेले नाही. क्रिकेट ज्या देशांमध्ये खेळला जातो. ते ब्रिटिशांचे मित्र राष्ट्र किंवा ब्रिटिशांच्या वसाहतींचा भाग होते. त्यामुळे चीनमध्ये क्रिकेटबाबत फारसे अनकूल मत नाही. ब्रिटिशांचा खेळ म्हणून क्रिकेट चीनमध्ये दुर्लक्षीत राहिला आहे. क्रिकटे संघ नसणाऱ्या किंवा क्रिकेट न खेळणाऱ्या देशांमध्येही क्रिकेटचे सामने उत्कंठेने बघितले जातात. मात्र, चीनमध्ये या खेळाला लोकप्रियताच नसल्याने क्रिकेट सामन्यांबाबतची उत्कंठा दिसत नाही. त्याऐवजी बॅडमिंटन, टेबलटेनिस हे खेळ चीनमध्ये लोकप्रिय आहेत.

क्रिकेटचा समावेश ऑलंपिक खेळांमध्ये नसल्याने हा जागतिक दर्जाचा खेळ नाही, असे चीनचे मत आहे. जगातील काही देशांमध्येच क्रिकेट खेळला जातो. त्यामुळे जगभरात खेळल्या जाणाऱ्या खेळांकडेच चीन लक्ष केंद्रीत करत असून त्यासाठी खेळांडूना प्रोत्साहन देण्यात येत आहे. जगभरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये जास्तीतजास्त खेळाडू उतरवून त्यात चमकदार कामगिरी करण्याचा चीनचा इरादा आहे. त्यामुळेही चीनमध्ये क्रिकेटला फारसा प्रतिसाद मिळत नाही. चीनमध्येही क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीकडून प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी बँकॉकमध्ये यावर्षी जानेवारीमध्ये टी-20 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात चीनचा महिला संघ सहभागी झाला होता. त्यात चीनच्या महिला संघाने फक्त 14 धावा केल्या. कोणत्याही क्रिकेट संघाने एवढ्या कमी धावा केलेल्या नाही. या स्पर्धेत चीनच्या संघाने संयुक्त अरब अमिरात संघाशी लढत दिली होती. क्रिकटमधील या दारुण पराभवामुळे चीनमध्येही क्रिकेटसाठी फारसे अनुकूल वातावरण नसल्याचे दिसून आले आहे.