
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे घडली आहे. या घटनेत गणेश राजेंद्र वांढेकर (17), श्रीकृष्ण सयाजी मतकर (14) दोघेही रा. मोहोज खुर्द अशी त्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहोज खुर्द येथे राजेंद्र उत्तम वांढेकर यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात सध्या पाणीसाठा असून आज दुपारी या शेततळ्यात पोहण्यासाठी राजेंद्र वांढेकर यांचा मुलगा गणेश वांढेकर ,श्रीकृष्ण मतकर व ज्ञानेश्वर तुकाराम वांढेकर हे तीन तरुण गेले होते. गणेश वांढेकर यास पोहता येत होते तर श्रीकृष्ण मतकर यास पोहता येत नव्हते. हे तिघेही तरुण शेततळ्यात उतरल्या नंतर श्रीकृष्ण मतकर हा बुडायला लागला असता त्याच्या मदतीला गणेश वांढेकर गेला मात्र दोघेही पाण्यात बुडाले. या वेळी ज्ञानेश्वर वांढेकर याने आरडा ओरडा करून जवळच्या नागरिकांना बोलावले मात्र उपयोग झाला नाही. घटनेनंतर काही वेळातच बुडालेल्या दोन्ही तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मोहोज खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.
























































