सुपरनोव्हास विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जयपूर

गतविजेत्या सुपरनोव्हासने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या किताबी लढतीत व्हेलोसिटी संघावर रोमहर्षक विजय मिळवून महिला टी-20 चॅलेंज क्रिकेट लीगचे विजेतेपद राखले. आधी शिस्तबद्ध गोलंदाजी, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचे झुंजार अर्धशतक आणि राधा यादकने अखेरच्या षटकात केलेल्या उपयुक्त फटकेबाजीच्या जोरावर सुपरनोव्हास संघाने सलग दुसऱया विजेतेपदावर आपले नाव कोरले. हरमनप्रीत कौर सामन्याची मानकरी ठरली.

व्हेलोसिटी संघाकडून मिळालेले 122 धावांचे लक्ष्य सुपरनोव्हाज संघाने 6 बाद 125 धावा करून पूर्ण केले. यात कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 37 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 51 धावांची तडाखेबंद खेळी केली. सलामीवीर प्रिया पुनिया (29) व जेमिमा रॉड्रिग्ज (22) यांनीही उपयुक्त खेळी केली. विजयासाठी 7 धावांची गरज असताना हरमनप्रीत बाद झाली, मात्र त्यानंतर राधा यादवने 4 चेंडूंत नाबाद 10 धावा करून विजय हातातून निसटू दिला नाही. शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना राधाने चौकार लगावत सुपरनोव्हासच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. व्हेलोसिटी संघाकडून जहानरा अलम व अमेलिया केर यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर देविका वैद्यने 1 बळी टिपला. त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना व्हेलोसिटी संघाने सुषमा वर्मा (नाबाद 40) आणि अमेलिया केर (36) यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर 6 बाद 121 धावा केल्या. अनुभवी मिताली राज (12), डॅनियल व्हॅट (0) यावेळी अपयशी ठरल्या. सुपरनोव्हाससाठी ली ताहुहूने 2, तर अनुजा पाटीलने 1 बळी मिळवला.