
सामना प्रतिनिधी। मुंबई
राज्यासाठी वीजनिर्मिती करण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या महानिर्मितीने सोमवारी रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती केली आहे. गेल्या 70 वर्षांत प्रथमच महानिर्मितीने तब्बल साडेनऊ हजार मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती केली आहे. चढलेला तापमानाचा पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे महावितरणकडे सध्या 18 हजार मेगावॅटपर्यंत विजेची मागणी नोंदवली जात आहे. सदर मागणी पूर्ण करण्यासाठी एकटी महानिर्मिती 60 टक्के वीज पुरवत आहे.
महानिर्मिती वीज कंपनीची एकूण वीजनिर्मिती क्षमता जवळपास साडेतेरा हजार मेगावॅटच्या घरात आहे, पण अपुरा कोळसा, पाणीटंचाई आणि वीज प्रकल्पातील तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत महानिर्मिती क्षमता मोठी असूनही केवळ पाच-सहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती करत होते. मात्र उन्हाळय़ातील विजेची वाढती मागणी विचारात घेऊन महानिर्मितीने कोळसा आणि पाण्याचे नियोजन केले आहे. तसेच प्रकल्पातील तांत्रिक कामे याआधीच पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत खासगी वीज प्रकल्प आणि केंद्रीय वीज प्रकल्पातून मिळणारी वीज कमी झालेली आहे. त्यामुळेच महानिर्मितीने रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती करत राज्याची गरज पूर्ण केली आहे. आधी एमएसईबी आणि आता महानिर्मितीच्या स्थापनेपासून अद्याप 9500 मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला नव्हता, पण तो सोमवारी गाठत तब्बल 20 कोटी 70 लाख युनिट वीज महावितरणला पुरवली असल्याचे महावितरणचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले.
औष्णिक प्रकल्पातून 15 कोटी युनिट
महानिर्मितीच्या या रेकॉर्डब्रेक वीजनिर्मितीमध्ये औष्णिक वीज प्रकल्पांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथून 7 हजार 120 मेगावॅटच्या क्षमतेने 15 कोटी 8 लाख युनिट विजेची निर्मिती केली आहे. त्याखालोखाल जलविद्युत प्रकल्पातून चार कोटी युनिट वीजनिर्मिती झाली आहे.






























































