मान्सून अंदमानात आला; हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत बळीराजासह सर्व जनतेचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. या सर्वांनाच दिलासा देणारी खूशखबर हवामान खात्याने दिली आहे. मान्सून अंदमानात पोहचला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला आहे.

अंदमानमध्ये 18-19 मेपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शनिवारीच मान्सून अंदमानात दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस हा 96 टक्के या दीर्घकालीन सरासरीइतका असेल. सरासरीच्या खाली व सरासरी या दोहोंच्या मध्ये तो यावेळी असण्याची शक्यता आहे. ‘स्कायमेट’ने मात्र यावेळी सरासरीपेक्षा कमी म्हणजे 93 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे.

काही दिवस आधीच मान्सूनचे आगमन

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत मान्सून दाखल होत असतो,  पण यावेळी मात्र मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरावरून या वाऱ्यांची उत्तरेकडे, पूर्व आणि ईशान्य हिंदुस्थानातील राज्यांकडे वाटचाल होते. केरळमध्ये 1 जूनपर्यंत व त्यानंतर महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होते.

96 टक्के पावसाचा अंदाज

गेल्या वर्षी मोसमी पाऊस 29 मे रोजी केरळमध्ये आला होता. त्यावेळी तो नेहमीच्या 1 जून या तारखेपेक्षा तीन दिवस अगोदर आला. तरी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला होता. 2017 मध्ये मोसमी पाऊस 30 मे रोजी केरळमध्ये आला होता, पण त्यावेळी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 95 टक्केच होता. यंदा ‘स्कायमेट’ने 93 टक्के तर हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.