दुष्काळी शहाणपण: त्यांनी मुलगी पाहीली, पसंत पडली, त्याच दिवशी लग्न लावले आणि घेऊन गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कौसडी

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे एकाच दिवशी वधूसंशोधन, पसंती, साखरपुडा आणि विवाह सोहळाही पार पडला. वधू आणि वराकडील मंडळी अतिशय समजूतदार निघाल्याने संभाव्य खर्चाला फाटा देत अत्यंत थाटामाटात हा विवाह झाला. सतत पडणारा दुष्काळ, लग्नामध्ये वधू पक्षास करावा लागणारा अनाठाई खर्च आदी बाबी लक्षात घेऊन वर पक्षाच्या पाहुण्यांनी आजच लग्न लावण्याचा विचार मांडला.त्याला वधू पक्षाच्या मंडळींनी त्वरीत संमती दिल्याने सांयकाळी ७ वाजता हनुमान मंदीर, कौसडी येथे विवाह सोहळा पारही पडला. जिवने व गोरे परिवाराने यातून एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परीस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरश: होरपळून निघाला आहे. लग्न म्हटले की, वधू पक्षात मोठा खर्च करावा लागतो. यातून वधू पित्यांना कर्ज बाजारी व्हावे लागते. परभणी येथील सुधाकर गोरे यांचा मुलगा राजेश गोरे यांच्या सोयरीकीसाठी पाहुणे १५ मे रोजी कौसडी येथील कै. कान्होबाराव जिवने यांच्या घरी आले असता वर वधूच्या पंसती नंतर साखरपूडा व लग्नाची तारीख काढण्याचे ठरले. परंतु वर पक्षाने आजच व लगेच लग्न लावण्याचा विचार मांडला. वधू पक्षाकडील शंकर जिवने, तातेराव बारवकर, आंगद जिवने, प्रल्हाद भोपे, श्रिंरग जिवने यांनी त्यास होकार दिला. दोन्हीकडील मंडळी लग्नास तयार झाली व संध्याकाळपर्यंत लग्नाची तयारी करण्यात आली. सांयकाळी ७ वाजता हनुमान मंदीर येथे वधू विद्या व वर राजेश यांचा विवाह पार पडला. उच्च विद्याविभूषीत विद्या व राजेश यांचा अनाठाई खर्चास फाटा देवून झालेला विवाह सोहळा आजच्या काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.