रेल्वे स्थानकांत एका क्लिकवर उसाचा रस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

उन्हाळ्यात आरोग्यदायी उसाचा रस जर रेल्वे स्थानकात प्यायला मिळाला तर किती बहार येईल ना! हो, रेल्वे प्रवाशांना आता एका क्लिकवर उसाचा रस प्यायला मिळणार आहे. आयआरसीटीसीने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात उसाच्या रसाची स्वयंचलित मशीन बसविली असून उन्हाने कातावलेल्या प्रवाशांना स्वच्छ उसाचा रस या मशीनद्वारे मिळणार आहे.

कुर्ला स्थानकात अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत तयार करण्याचा एका कामगाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुल्या सरबतांच्या विक्रीवर मध्य रेल्वेने बंदी घातली होती. त्यानंतर आता आधुनिक पद्धतीने कमीत कमी मानवी संपर्काआधारे सरबत देणारी वेंडिंग मशीन ‘रेल्वे कॅटिरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच आयआरसीटीसीने आणली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात अशी अत्याधुनिक स्वयंचलित उसाचा रस देणारी मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनद्वारे आता एका क्लिकवर प्रवाशांना उसाचा रस मिळणार आहे.

–  पारंपरिक पद्धतीने उसाचा रस तयार करताना रस तयार करणारी व्यक्ती उघडय़ा हातांनी उसाचे तुकडे मशीनमध्ये टाकते आणि त्यासाठी वापरण्यात येणारा बर्फही चांगल्या दर्जाचा नसतो. त्यामुळे हा रस अनारोग्यकारक असतो. म्हणूनच आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकात उसाचा रस तयार करण्यासाठी ‘वेंडिंग मशीन’ बसवण्यात आली आहे. या मशीनची किंमत दोन लाख 10 हजार रुपये असणार आहे. या उसाच्या रसासाठी प्रवाशांना 30 रुपये मोजावे लागणार आहेत.