राज्यात काँग्रेस कोमात, दोन माजी मुख्यमंत्री, दोन आजी-माजी मुंबई अध्यक्षांचा दारुण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress-logo

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात शिवसेना-भाजपच्या बलाढय़ महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने तब्बल 56 घटक पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली, पण तरीही राज्यात काँग्रेसला लोकसभा निडणुकीत एकच खासदार निवडून आणता आला. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री आणि मिलिंद देवरा व संजय निरुपम या दोन आजी-माजी मुंबई अध्यक्षांच्या दारुण पराभवामुळे मुंबई काँग्रेस कोमात गेली आहे, आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी काँग्रेस लढण्याच्या मनःस्थितीतच नाही.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आरपीआयच्या विविध घटकांसोबत बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन 56 पक्षांची महाआघाडीची घोषणा केली. या महाआघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत रंगत येईल असे वाटले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेसचा राज्यात सफाया झाल्याचे दिसून आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून अशोक चव्हाण व हिंगोलीतून राजीव सातव हे दोन खासदार निवडून आले होते, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर चंद्रपुरातून सुरेश तथा बाळू  धानोरकर हे एकमेव खासदार निवडून आले आहेत. सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसचे नव्हतेच. शिवसेनेतून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यावर धानोरकर यांना उमेदवारी नाकारली होती, पण त्यांना उमेदवारी दिल्यामुळे धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले. अन्यथा काँग्रेसला राज्यात खातेही उघडता आले नसते.

प्रभावहीन काँग्रेस

अंतर्गत मतभेद व समन्वयाचा अभाव यामुळे काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येते. विधानसभेतही काँग्रेसच्या आमदारांचा कधीच प्रभाव दिसला नाही. त्यातच तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर लोकसभा निवडणुकीत उघडपणे भाजपचा प्रचार केला, पण त्यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेस नेतृत्वाने धमक दाखवली नाही. काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे मागील आठवडय़ात नवीन पक्षनेता निवडीसाठी मुंबईत आले होते, पण नेता निवडण्याऐवजी नवीन नेता निवडीचे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवले, पण नेतृत्वाअभावी काँग्रेस पक्षच दिशाहीन झाल्यामुळे नवीन गटनेत्याची निवड करण्याच्या मनःस्थितीत आता काँग्रेस नाही.

राहुल गांधी मुंबईत फिरकलेच नाहीत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मुंबईकडे दुर्लक्ष केले. राहुल गांधी पुण्यापर्यंत येऊन गेले, पण मुंबईत प्रचाराला फिरकले नाहीत. चंद्रपूर, संगमनेर, नांदेडमध्ये राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतल्या, पण मुंबईत एकही प्रचार सभा घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाRमध्येही किती निरुत्साह होता हे दिसून आले. आता काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकाचे रणशिंग फुंकले जाईल, पण काँग्रेसने मान टाकल्यामुळे राज्यात काँग्रेसच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव

सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे व नांदेडमधून अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना दारुण पराभवाला सामारे जावे लागले. सोलापूर हा शिंदे यांचा व नांदेड हा अशोक चव्हाण यांचा भक्कम गड म्हणून ओळखला जात होता. पण मोदी लाटेत या दोन्ही माजी मुख्यमंत्र्याचे गड नेस्तनाबूत झाले. प्रदेशाध्यक्ष हा टीमचा नेता असतो, पण काँग्रेसच्या या नेत्यालाच पराभव पत्करावा लागला. मोदी लाटेचा अंदाज आल्यामुळे अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नव्हते, पण पक्षश्रेष्ठाRनी दबाव आणल्यामुळे अशोक चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले होते. अशोक चव्हाण यांचा 1989 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

मुंबई अध्यक्षांचा पराभव

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांना हटवण्यात आले आणि नव्या दमाच्या मिलिंद देवरा यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, पण मिलिंद देवराही मुंबई काँग्रेसला ऊर्जा देऊ शकले नाहीत. दक्षिण मुंबईतून देवरा यांनाही पराभव पत्करावा लागला. मिलिंद देवराही निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. तसेच उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्तही निवडणूक लढवण्यास तयार नव्हत्या. पण या दोघांनीही मनाविरुद्ध ही निवडणूक लढवली. मुंबईत तर सहाही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा महायुतीने पराभव केल्यामुळे काँग्रेस कोमात गेली आहे.