आपला नाद करायचा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

“जेथे रिस्क तेथे सुरेश धस यांची इन्ट्री फिक्स” हे स्लोगन सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. कारणही तसेच आहे. मतांची गोळा बेरीज राष्ट्रवादीकडे जास्त असताना सुरेश धस यांनी स्थानिक स्वराज निवडणुकीत जुगार खेळला अन निवडून येण्याची कोणतीही शक्यता नसतांना सुरेश धस तीन जिल्ह्यांचे आमदार झाले. लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने प्रचाराचा धुराळा उडवला. जाती – पातीच्या विषारी प्रचारामुळे आष्टी मध्ये काय होईल ही धाकधूक निर्माण झाली. भाजपाची सर्व भिस्त आष्टी मतदार संघावर होती आणि भाजपाचा विश्वास सार्थ ठरवत सुरेश धस यांनी आष्टीतून 70 हजाराचे मताधिक्य भाजपाच्या झोळीत टाकत आपला नाद करायचा नाही हे दाखवून दिले.

सुरेश धस म्हणजे बीड जिल्ह्यातील सामान्य माणसाचे नेतृत्व मानले जाते. ना अहंकार ना कोणता थाटमाट म्हणूनच धस भोवती कधीही सामान्य माणसांची गर्दी कायम असते. एक रांगडं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ‘मै हू डॉन’ असो की ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरलेल्या सुरेश धस यांना उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. मी केवळ जनतेला नादी लावण्याचे काम करत नाही तर जनतेच्या बारीकसारीक अडचणींसाठी धावून जाण्याचे काम करत असतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची निर्णय क्षमताही भारी. कोणते धाडस कधी करायचे यात हातखंडा आणि समय सूचकतेला त्यांच्या चॅलेंजच नाही. अवघड असलेली बीडची जिल्हापरिषद त्यांनी भाजपाच्या ताब्यात दिली. प्रतिकूल परीस्थितीत स्थानिक स्वराज मतदार संघातून ते विजयी झाले. प्रीतम मुंडेना 70 हजाराचे मताधिक्य मिळवून दिले. अवघड काम सोपं करणे म्हणजे सुरेश धस, हे राजकारणात समीकरण झाले आहे.

विधानपरिषदेमध्येही आपल्या गावरान शैलीने विरोधी पक्षाची हवा गुल करणारे सुरेश धस यांनी अटी तटीच्या या निवडणुकीत आपला नाद करायचा नाही, हे दाखवून दिले.