कृतिशील ‘लोहपुरुष’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरविंद दोडे

सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानचे पहिले उपपंतप्रधान, स्वातंत्र्य आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते, एकात्म हिंदुस्थानचे शिल्पकार, पोलादी पुरुष म्हणून विख्यात, साधी राहणी, उच्च विचारसरणी, फाळणीमागील द्विराष्ट्रवादाला विरोध करणारे, चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त, वास्तवतेचे विलक्षण आकलन, राजकारणासाठी सर्व आवश्यक ते गुण. कोणत्याही समस्येकडे ‘फलप्रामाण्यवादी’ दृष्टिकोनातून पाहणारे सरदार ‘प्रिन्स बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजनेते’ होते, असे ‘लंडन टाइम्स’ने जाहीर केले होते.

सरदार जन्मले 31 ऑक्टोबर 1875 रोजी. शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील नेतृत्व गुण दिसू लागले होते. 1891 मध्ये त्यांचा जव्हेरबाईशी विवाह झाला. 1897 मध्ये ते मॅट्रिक झाले. पुढे ते वकील झाले अन् गोध्रा येथे वकिली करू लागले. 1909 मध्ये जव्हेरबाई निवर्तल्या. 1910 मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. तिथे ते प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. मग अहमदाबाद येथे वकिली सुरू केली. 1917 मध्ये महात्माजी तिथे आले. सरदार त्यांना भेटले आणि सरदारांचे आयुष्यच बदलून गेले. पुढील इतिहास जितका प्रेरणादायक आहे, तितकाच चमत्कारपूर्ण आहे. सुमारे 33 वर्षे ते देशसेवा करीत होते. त्यात स्वातंत्र्य लढय़ापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा इतिहास लेखकद्वयीने सविस्तरपणे मांडलेला आहे, तो फारच उद्बोधक आहे. गांधी, नेहरू आणि पटेल हा मुख्य त्रिकोण बापूंच्या पायाशी सर्व एकनिष्ठ म्हणून एकसंध संघटना कशी टिकली याचे उत्तरही या पुस्तकात मिळते.

राजकारणाच्या पटावर हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्ष 1947 नंतर वाढत चालला होता. मात्र या प्रकरणात पटेलांना फारसे महत्त्व नेहरूंनी दिले नव्हते. 1948 मध्ये हिंदुस्थानने राष्ट्रसंघात कश्मीर प्रश्नाबाबत तक्रार नोंदविली. त्यानंतर आजपर्यंत सुमारे 70 वर्षे हा प्रश्न सुटलेला नाही. याबाबतीत पटेलांचा विरोध होता, तो कसा हे समजून घेणे फार आवश्यक आहे. नेहरूंनी केलेल्या काही घोडचुका आणि त्यांना झालेला पश्चात्ताप हे वाचून वाचक सुन्न होतो. दुसरा प्रश्न होता संस्थानिकांच्या स्वातंत्र्याचा. याबाबतचा आणि इतर अनेक समस्यांचा पत्रव्यवहार पुरावा म्हणून पानोपानी घेतलेला आहे. त्यातही हैदराबादचा निजाम म्हणजे भयाण डोकेदुखी होती. पटेलांनी पुढाकार घेऊन त्याचे संस्थान कसे खालसा केले हे मोठे चित्तथरारक प्रकरण आहे.

याशिवाय पंचावन्न कोटी रुपयांचा मामला, म्हणजे हिंदुस्थानने पाकिस्तानला कर्ज फेडण्यासाठी म्हणून (परतफेडीच्या बोलीने, अर्थात लिखित) पिच्छा पुरवला होता. सरदारांनी विरोध केला होता. इथेही गांधींनी ‘माणुसकी’ दाखवली. ती रक्कम पाकला देण्यात आली. अजून ती परत मिळालेली नाही. ती का याचे वर्णनही अस्वस्थ करते. दुसरी समस्या होती धोरणाची. ती वाचतानाही नेहरूंच्या धोरणांची झळ हिंदुस्थानला कशी बसली, त्या धोरणांचे दुष्परिणाम अजूनही आपण कसे भोगत आहोत याचा अंदाज सहज करता येतो. एकूणच फाळणीची अपरिहार्यता स्पष्ट झाली असली तरी नोकरशाहीचा पाया मजबूत होता की ठिसूळ होता याचा प्रत्यय येतो. मतभेद आणि एकमत यांच्या सीमारेषेवर पटेलांच्या जीवनात वादळ कसे घोंघावत होते हे वाचणे म्हणजे इतिहासाशी नव्याने ओळख होणे!

लोहपुरुष
धीरू मेहता आणि शेषराव चव्हाण
अनुवाद – सुहास फडके
प्रकाशन – परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे
पृष्ठ – 209 मूल्य – 400 रुपये