
सामना प्रतिनिधी, नगर
नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील बाळासाहेब दिनकर गोरे या शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत गोरे यांच्याकडे विविध बँकांचे लाखो रुपयांचे कर्ज होते.
मात्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ते आर्थिक अडचणीत आले. याला कंटाळून त्यांनी रविवारी (दि.26) रात्री आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या मागे एक विवाहित मुलगा, दोन अविवाहित मुले, सुन, नातवंडे व वृद्ध आई असा परिवार आहे. या घटनेची माहिती माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ व पंचायत समिती सदस्य किरण भापकर यांना मिळाल्यावर त्यांनी याबाबत नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



























































