
सामना प्रतिनिधी, नगर
भरधाव वेगात जाणाऱ्या साईभक्तांच्या इनीव्हा गाडीची टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रक वर आदळून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहे.
ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राहाता शहरातील पुलानजीक घडली. कर्णाटक राज्यातील साई भक्त इनीव्हा गाडी क्रमांक एम एच 43 ए 7500 ही शिर्डीला जात असताना राहाता शहरातील पुलानजिक आली असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती शिर्डीकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकवर समोरासमोर आदळली. यात इनिव्हा चक्काचूर होऊन गाडीतील आठ जण जखमी झाले असून जखमीत लहान मुलांचाही समावेश असून चार जण गंभीर जखमी आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून जवळच बसलेले राहाता येथील तरून दशरथ तुपे, किरन वाबळे, पालीका कर्मचारी अनिल कुंभकर्ण, वैभव कदम, इरफान शेख, प्रसाद देव्हारे, राजू कदम, बबलू गांगुर्डे यांनी सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढून शिर्डी सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलला उपचारासाठी दाखल करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. तर साईबाबा संस्थानने या सर्व साई भक्तांवर मोफत उपचार व सुविधा दिली.
























































