कॅण्टीनच्या जेवणात पाल; 18 कामगारांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  नागपूर

औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपनी मोरारजी टेक्स्टाइल प्रायव्हेट लि. येथील कॅण्टिनमध्ये जेवणात विषारी पाल आढळून आल्याने येथील जवळपास 18 कामगारांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना  बुटीबोरी एमआयडीसी पोलीस हद्दीत घडली.

मोरारजी टेक्स्टाइल कंपनीत आशीष मिश्रा नामक व्यक्तीची दुर्गा गणेश कॅटरिंग सर्व्हिस नावाची कॅण्टीन आहे. कामगारांना जेवण पुरविण्याचे कंत्राट आहे तर स्वच्छतेचे काम उमेश पांडे नावाची व्यक्ती बघते. 28 मे रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिजहे यांच्या जेवणाच्या ताटातील डाळीमध्ये पाल आढळून आली. जवळपास 18 कामगारांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेची माहिती बुटीबोरी एमआयडीसी ठाण्याचे प्रभारी सुनील लांघी यांना मिळताच त्यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले

या घटनेची नोंद बुटीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्याला करण्यात आली असून प्रयोगशाळेत जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.अहवाल प्राप्त झाल्यानंतर  प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी सुनील लांघी यांची आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील लांघी करीत आहे.