आंबा बागेवर ग्रेन नेटचे अच्छादन, युवा शेतकऱ्याचा फळबाग वाचविण्यासाठी आटापिटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपुर

तालुक्यात गेल्या तीन चार वर्षात कमी झालेले पर्जन्यमान याचा परिणाम शेती व फळबागेवर जास्त प्रमाणात होत आहे. या तालुक्याची कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख आहे. शेतीतील विहीरी आटल्या, बोअर आटले त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी जीवापाड जपलेल्या फळबागा वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. हडोळती येथील युवा शेतकरी महेश पंडीतराव पवार यानी आंब्याच्या बागेवर चक्क ग्रेन नेट चे आच्छादन टाकून झाडे वाळू नये म्हणून आमराई जगवण्याचा जिवापाड प्रयत्न करत आहेत.

मुखेड – शिरुर रोडलगत महेश पवार यांनी पंधरा वर्षापूर्वी केशर आंब्याची साठ रोपाची दीड एकरमध्ये लागवड केली. शेतीतील एक विहीर, दोन बोअर यांच्या माध्यमातून आजवर ही बाग तग धरुन होती. परंतु आता विहीर, बोअर आटल्यामुळे या शेतकऱ्यांने टँकरचे पाणी 800 ते 900 रुपयाने पाणी विकत घेऊन या शेतकऱ्याने जीवघेण्या दुष्काळावर मात करीत आपली जीवापाड जपलेली आमराई जगविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु महीनाभरापासून तर विकतचे पाणीही मिळत नसल्याने फळबाग करपू लागली आहे. केशर आंब्याला पाणी जास्त प्रमाणात लागते. ही आंबा बाग वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या सुक्ष्म अन्न द्रव्याच्या फवारण्या केल्या आहेत. पंधरा वर्षापूर्वी 70 ते 80 हजार रुपये खर्च करुन लागवड केलेली आमराई वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आता त्यांनी सर्व आमराईवर ग्रेन नेट करून, झाडाचा बुडाला शेणखत, कुजलेले गवत टाकलेले आहे. यामुळे झाडाला थंडावा राहत आहेत.

पांरपारिक शेतीला छेद देत शेतकरी फळपिकाकडे वळत आहेत मात्र सततच्या दुष्काळाने जबरदस्त फटका फळबागांना बसत आहे त्यामूळे तालुक्यातील शेतकऱ्याचे हजारो आंब्यांचा झाडाचे दुष्काळामुळे नुकसान होत असून बागायतदार शेतकऱ्यांनी झाडावर केलेल्या खर्चाचे काय अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . महसुल प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत