
>> दिवाकर शेजवळ
कोंडीबा समनाक म्हणजे कोंडीबा डोंगरगावकर. मराठवाडा मुक्ती संग्रामातील भूमिगत सेनानी. त्यांनी ९१व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने लातूरच्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे नवी मुंबईत त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त या सेनानीची जीवनाथा त्यांच्याच शब्दात…
माझा जन्म ऑगस्ट 1928 मधला. निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी झालेल्या घनघोर स्वातंत्र्य संग्रामातील मी सेनानी आहे. भूमिगत स्वातंत्र्यसैनिक. आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण आमचा मराठवाडा मात्र निजामाच्या तावडीतून एक वर्ष उशिरा म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी सुटला. अन् स्वतंत्र हिंदुस्थानचा घटक झाला. निजामाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी मराठवाड्याला निकराचा संघर्ष करावा लागला. त्याला इतिहासात ‘हैदराबादचा मुक्ती संग्राम’ म्हटले जाते.
मराठवाड्याच्या मुक्तीसाठी झालेल्या लढ्यातील सहभागावेळी मी 18 ते 20 वर्षे वयाचा होतो. ‘आठवणींचे पक्षी’ हे आत्मकथन लिहिलेले दिवंगत दलित साहित्यिक प्रा. प्र. ई. सोनकांबळे हे माझे समकालीन होते. माझ्या बालपणीच आई-वडिलांनी डोंगरगाव (ता. जळकोट, जि. लातूर) येथे स्थलांतर केले होते, पण आमचे मूळचे खरे गाव त्याआधी नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील राजा दापकं हे होते. ते गाव निजामाच्या अधिपत्याखालील रजपुत राजा सुंदरसिंग यांच्या अमलाखालील प्रदेशात मोडत होते. त्या काळात तेथील अस्पृश्य समाजाकडे चार गावांची ‘वतने’ म्हणजे गावकीची कामे होती. या कामांवरून आमच्या भावकीतील कुटुंबांना प्राप्त झालेल्या ‘आडनावां’चा इतिहास मोठा रंजक आहे. राजा सुंदरसिंग यांच्या उद्यानातील विहारासाठी, फेरफटक्यासाठी कोमेजलेली फुले हटवण्याचे काम करणार्यांना ‘फुलसरे’ हे आडनाव प्राप्त झाले तर राजाच्या गावातील भेटीची ‘खबर’ त्या काळात हरणाच्या शिंगांपासून बनवलेले ‘बिगूल’ वाजवून दिली जायची. हे काम करणार्यांना ‘शिंगाडे’ हे आडनाव मिळाले. अन् गावांमध्ये जागल्याचे काम करणारे जे होते त्यांना ‘सूर्यवंशी’ हे आडनाव लाभले. डोंगरगावला स्थलांतरित झाल्यानंतर आमच्या कुटुंबाला ‘डोंगरगावकर’ अशी नवी ओळख मिळाली हे खरे, पण निजामविरोधी उठावात सेनानी म्हणून त्या काळातील प्रथेप्रमाणे माझे नाव ‘कोंडिबा समनाक’ असे सरकारी दरबारी नोंदले गेले आहे. मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात क्रांतिकारकांना दारूगोळा पुरवण्याचे काम मी बराच काळ भूमिगत राहून केले. त्या काळात संग्राम जामकर, राजाराम करडे आदी माझे सहकारी होते.
निजामाची जुलमी राजवट उलथवण्यासाठी आम्ही क्रूर रझाकारांशी संघर्ष केला. माझ्यासह सहकार्यांच्या हाती दारूगोळा देण्याचे काम अनेक क्रांतिकारकांनी केले. त्यात मल्लेश पाटील (नागराळकर), गंगाधर पाटील (साकोळकर), गुणवंत पाटील (मलकापूरकर), आप्पाराव पाटील (कोलखेडकर), रामराव हरिराव, संभाजीराव मुळे यांच्यासारख्यांचा प्रामुख्याने समावेश होता.
निजामाच्या राजवटीविरोधात मराठवाड्यात हिंदू आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांनी खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. कारण रझाकारांच्या अत्याचारांचा सामना त्या दोन्ही समाजांना विशेषतः महिलांना करावा लागायचा. त्यामुळे निजाम राजवटीच्या विरोधातील चीड सार्वत्रिक होती. विशेष म्हणजे, त्या काळात अस्पृश्यांना फक्त सवर्ण हिंदूच तुच्छतेची वागणूक द्यायचे, अशातला भाग मुळीच नाही. निजामाच्या राजवटीत मुसलमानही अस्पृश्यांना तशीच वागणूक द्यायचे. रझाकार हे हिंदू आणि अस्पृश्य या दोन्ही समाजांतील महिलांवर जुलूम जबरदस्तीने अत्याचार करायचे. तो काळ मराठवाड्यातील जनता सहजासहजी विसरू शकत नाही.
साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्या प्रांतात सभा-परिषदा घेण्यास निजामाची बंदी होती. त्यामुळे बाबासाहेबांना निजामाच्या अमलाखालील प्रदेशाच्या सीमेपलीकडेच सभा घेणे त्यावेळी भाग पडले होते. इतिहास हा असा आहे. उलट देशाच्या स्वातंत्र्यानंतर ‘पोलीस कारवाई’ करून निजाम विरोधातील कामगिरीत बाबासाहेबांनीच महत्त्वाची भूमिका बजावली. हा सत्य इतिहास उशिरा का होईना, नामांतराच्या लढय़ाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या भावी पिढ्यांसमोर आता आलेला आहे.
माझ्या 91 वर्षे वयाच्या काळात मी निजामाची राजवट, आर्य समाजाची चळवळ, नामांतराचा लढा, वारकरी संप्रदायाचे कार्य यांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. या निरनिराळ्या विचार प्रवाहांतील सहभागामुळे अनुभवातून बर्याच गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. आजच्या पिढीला त्या कळण्यासाठी आवर्जून सांगितल्या पाहिजेत. वारकरी संप्रदायातील सहभागामुळे पंढरीच्या वार्या मीसुद्धा केल्या, पण विठ्ठलाच्या चरणापाशी आम्हा अस्पृश्यांना ‘पंगती’मध्ये मात्र वेगळे स्थान दिले जायचे. केवळ ‘वारी’मध्ये आम्हाला ‘संगती’ला घेतले जायचे.
मुसलमानांचा आणि आमचा ‘आहार’ समान होता. तरीही मुस्लिम घरांमध्येही आम्हाला प्रवेशाला मज्जाव होता. हिंदू आणि अस्पृश्य यांचा तर ‘आहार’ असमान होता. सवर्ण हिंदूही आमच्याशी भेदभाव करून तुच्छतेची वागणूक द्यायचे हे खरे, पण तरीही त्यांच्यात ‘माणुसकी’चे दर्शन घडायचे, मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते, कारण आम्हा अस्पृश्यांना उच्चवर्णीय मराठे लोक त्या काळात पाणी ‘वरून’ वाढायचे ही गोष्ट खरी, पण तहान-भुकेची जाणीव ठेवण्याची माणुसकी त्यांच्यात जरूर होती. कोणाची उपासमार करण्याची त्यांची वृत्ती नव्हती. तसेच आपल्या घरी चाकरी करणार्यांनाही आपण खाऊ, तेच खायला देण्याची भावना मराठा समाजात दिसायची, पण ही ‘माणुसकी’ मराठवाडा विद्यापीठ नामांतरविरोधी अत्याचारी आंदोलनातील क्रौर्यावेळी वणव्यात खाक होताना दिसली. याचे मला खूप दुःख वाटते.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी असल्याने मागास समाजघटकांनी उन्नतीसाठी शिक्षणाचा ध्यास बाळगावा, असे माझे मत आहे. माझी मुले शिकत असताना आमच्या डोंगर गावातील शाळा चौथीपर्यंतच होती. त्यामुळे मला मुलांना पुढील शिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील मंगल सांगवी या गावात पाठवावे लागले होते. त्याची आठवण विसरता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा 20 वर्षे सदस्य असतानाच्या काळात मी स्वतःची एक एकर जमीन शाळेसाठी दान केली. त्यातून डोंगर गावात सातवीपर्यंतची शाळा सुरू होऊ शकली. सिद्धार्थ कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी.के. डोंगरगावकर हे माझे पुत्र आहेत. त्यांनीही मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानींच्या पेन्शनच्या योगदानातून लातूरमध्ये राहुल शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. अन् त्या संस्थेतर्फे नवी मुंबईतील खारघर येथे ‘सत्याग्रह महाविद्यालय’ उभे केले आहे. त्या कामगिरीचा माझ्यासारख्या निरक्षर पित्याला अभिमान वाटत असून जीवन कृतार्थ झाल्यासारखे मला वाटते.


























































