माजलगाव तालुक्यात अनेक गावात टँकर बंद; गावातच पाणीपुरवठ्याची केली सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

तालुक्यातील अनेक गावात असलेल्या पाणीदार विहीर व बोअरवरून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तात्पुरती पाईपलाईन करून पाणीपुरवठा करण्याची शक्कल लढवली. त्यामुळे मोठ्या गावातील सुरू असलेले टँकर बंद करून सरकारच्या 25 ते 30 हजार रूपयांची बचत झाली आहे. तसेच खर्चही नियत्रणात आला आहे. तालुक्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ 78 टँकर सुरू करण्यात आले होते. त्यावेळेपेक्षा आता चालू असलेल्या भीषण दुष्काळात 59 गावांना 56 टँकरद्वारे 112 खेपा केल्या जात आहेत. तर 40 गावात 134 अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्यात धर्मेवाडी येथे पहिले टँकर सुरू करण्यात आले होते.

या उन्हाळ्यात उन्हाची दाहकता पाहता मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू करावे लागू शकतात, यामुळे पंचायत समिती सभापती अलका जयदत्त नरवडे यांनी मागील दोन महिन्यांपासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी संपर्क करून काही मोठ्या गावातील विहिरी व बोअरवर पाईपलाईन करून या गावांना पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. असे कळविले. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील तालखेड या ठिकाणी गावाशेजारी असलेल्या शेतातील विहिरीवरून गावात पाईप लाईन करून पाणी प्रश्न सोडवला आहे. यामुळे गावात सुरू असलेले 5 पाण्याचे टँकर बंद केले. याच बरोबर नित्रुड, दिंद्रुड व इतर दोन-तीन ठिकाणी अशा उपाययोजना सुरू असून याद्वारे दोन दिवसात या गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. टँकर भरण्यासाठी खाजगी 20 विहिरी व बोअरवरून पाणी भरण्यात येत आहे. यावर देखील शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सभापती अलका नरवडे यांनी केसापुरी येथील ग्रामपंचायतच्या मालकीच्या विहिरीवरून टँकर भरण्यास सुरू केले असून यामुळे टँकर भरण्यासाठी खाजगी अधिग्रहण यामुळे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे पाणी टंचाई कक्षप्रमुख डी.एल.गडपाळे यांनी दिली. या उपायामुळे महिन्याला शासनाचा लाखो रूपये फायदा होणार आहे.

आम्ही स्थानिक पातळीवर पाण्याची उपलब्धता बघून कमी खर्चात गावाला पाणी पुरवठा करण्याचे ठरवले. यामुळे टँकरवर होणारा मोठ्या प्रमाणावरचा खर्च कमी झाला आहे. टँकरला गावात येण्यासाठी वेळ लागतो, यामुळे नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत होती. स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्याने नागरिकांची होणारी पायपीट थांबली आहे असे, अलका नरवडे यांनी सांगितले.