पशुधन राहत व चारा शिबिरास 18 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील सात जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या 8 पशुधन राहत व चारा शिबिरास 18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या चारा शिबिरांसाठी विभागाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार राज्य सरकारने हा निधी मंजूर केला आहे.

राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात चारा छावण्यांप्रमाणेच काही गोशाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पशुधन राहत व चारा शिबिर सुरू करण्यात आले आहे. राज्यातील उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, औरंगाबाद, नगर, हिंगोली या सात जिल्ह्यांत 8 पशुधन राहत व चारा शिबिरे सुरू केली आहेत.

या शिबिरांसाठी 18 कोटी 19 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर करण्यात आलेल्या अनुदानापैकी चारा छावणी चालकांना मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर 70 रुपये आणि प्रती लहान जनावर 35 रुपये या दराने 13 कोटी 38 लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. तसेच राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 आणि 15 मे 2019 पासून मंजूर केलेल्या वाढीव दराने अनुदान देण्यासाठी 4 कोटी 81 लाख रुपये असे एकूण 18 कोटी 19 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. हा निधी 30 जूनपर्यंत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत खर्च न होऊ शकणारा निधी पुन्हा राज्य सरकारकडे जमा करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.