आर्थिक विकास आणि रोजगारवाढीसाठी पंतप्रधानांकडून दोन समित्या स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि वाढत्या बेरोजगारी रोखून रोजगारीवाढीसाठी सूचना आणि शिफारसी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि वाढत असलेली बेरोजगारी ही प्रमुख आव्हाने मोदी सरकारपुढे आहेत. या समस्या सोडवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोन मंत्रिमंडळ समित्यांची स्थापना केली आहे. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासह रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांकडे देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी अध्यक्ष असलेल्या दोन समित्यांपैकी विकास आणि गुतंवणूकीशी संबंधित पहिल्या समितीत 5 सदस्य आहेत. ही समिती गुंतवणूक आणि विकास यासंदर्भात काम करेल. या समितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांचा समावेश आहे. तसेच रोजगार आणि कौशल्य विकास यासंदर्भात काम करणाऱ्या दुसऱ्या समितीत 10 सदस्य आहेत. अमित शहा, निर्मला सीतारामन, पियूष गोयल यांच्यासह कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल, पेट्रोलियम तसेच नैसर्गिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकासमंत्री महेंद्र नाथ पांडेय, कामगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार तसेच शहर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी आदी सदस्यांचा समावेश आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेची कमी होत असलेली गती वाढवणे हे मोदी सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकास दरात घसरण होऊन तो 5.8 टक्क्यांवर आला. तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून तिसऱ्या तिमाहीपर्यंत विकास दर 6.8 टक्क्यांवर आहे. गेल्या पाच वर्षातील ही निचांकी संख्या आहे. त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीचा दरही 6.1 टक्क्यांवर होता. जो गेल्या 45 वर्षांतील उच्चांकी दर आहे. त्यामुळे ही दोन प्रमुख आव्हाने पेलण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोन समित्या स्थापन केल्या आहे.