सिंधुदुर्गात वळिवाच्या पावसाचे धुमशान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

वेधशाळेचा अंदाज चुकवत मिरगाच्या एक दिवस अगोदरच सिंधुदुर्गात वळिवाच्या पावसाने गुरुवारी पहाटे धुमधडाक्यात एण्ट्री केली. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह तब्बल एक तास कोसळणाऱया वरुणराजाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांत मात्र टिपूसभरही पडला नाही. पहिल्याच पावसात मातीचा भराव रस्त्यावर आल्याने मुंबई-गोवा महामार्ग चिखलात गेला. वेंगुर्ल्यात नौकेवर वीज पडली, तर वीज तारा तुटल्याने कुडाळमध्ये चार म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 10.55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेले काही दिवस आकाशात ढग दाटून येत आहेत. वातावरणातही कमालीची उष्णता वाढली असतानाच गुरुवारी सकाळी 6च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलेले दिसून येत होते. काही ठिकाणी वादळसदृश पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली होती.

एसटी फसली
कणकवलीत उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आज पडलेल्या पावसाने सर्वच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले. रस्त्याच्या बाजूला टाकलेला भराव खचल्याने वागदे येथे दोन दुचाकी अडकल्या, तर कणकवलीत एसटी बस भरावात फसली होती. गटारे खुली न केल्याने रस्त्यावरचे पाणी थेट दुकानात जाऊन त्यांचे नुकसान झाले.

मच्छीमारी नौकेवर वीज पडली
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी गुरुवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास देव रवळनाथ पारंपरिक मच्छीमार (रापण) यांच्या मच्छीमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छीमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणाला इजा झालेली नाही. किनाऱयावर असलेल्या आपल्या मच्छीमारी नौकेत पाणी जाऊ नये यासाठी ही नौका मागे ओढण्यासाठी ताता केळजी, बाळू भगत, नाना कोचरेकर, दादा मसुरकर, आबा मुनणकर, बाळा आदी प्रयत्न करीत होते. त्याच वेळी एक विजेचा लोळ नौकेवर कोसळला.

z पाच जनावरे मृत्युमुखी
कुडाळ तालुक्यातील बांव राघोभाटी येथील माड बागायतींमध्ये तुटून पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने सोनवडे-बळीचे टेंब येथील शेतकरी सुधीर आसोलकर यांच्या चार म्हशी व एक गाय अशा एकूण पाच जनावरांचा जागीच मृत्यू झाला. याच तारेच्या स्पर्शाने एक कोल्हा व चिमणीचाही मृत्यू झाला. या घटनेत शेतकरी बचावले. गुरुवारी सकाळी 9.30च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आसोलकर यांचे सुमारे दीड लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आल्यानंतर तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सरपंच नागेश परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष महिपाल धुरी, वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन भेंडेकर, वायरमन विजय येरम, ग्रामसेविका एस.जी. मसके आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. याबाबतची माहिती कुडाळ पोलीस ठाणे व पंचायत समिती प्रशासनाला देण्यात आली. महावितरण कंपनीने आसोलकर यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.

घरांची पडझड
मुसळधार पावसासह आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे आचरा वरची वाडी येथील विलास आचरेकर आणि भजनीबुवा रामदास आचरेकर यांच्या घरांवर वृक्ष पडून नुकसान झाले. हिर्लेवाडी येथील सुहासिनी कांबळी यांच्या घरावरही वृक्ष उन्मळून पडला. त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा कांबळी, पोलीसपाटील जगन्नाथ जोशी, समीर बांवकर आदींनी भेट देऊन पाहणी केली.

तालुकावार पाऊस पुढीलप्रमाणे
सर्व आकडे मिलीमीटर प्रमाणात आहेत. दोडामार्ग – 10, सावंतवाडी – 8, वेंगुर्ला – 25.4, कुडाळ – 20, मालवण – 20, कणकवली – 01, दोडामार्ग – निरंक, वैभववाडी – निरंक