
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
मासेमारी बंदीचे उल्लंघन करून जयगड बंदरात मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त विभागाने कारवाई केली आहे. दोन नौकांवरील एकूण 40 हजारांची मासळी जप्त केली असून 2 लाखांचा संभाव्य दंड ठोठावला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत 13 नौका पकडण्यात आल्या आहेत.
1 जूनपासून यांत्रिकी पद्धतीने मासेमारी बंदीचा काळसुरु झाला असला तरी कोकणातील किनाऱ्यावर मासेमारी सुरु आहे. यापूर्वी 11 नौका मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त विभागाने पकडल्या होत्या. आज पुन्हा जयगड बंदरात 2 नौका पकडल्या. त्यामध्ये शौकत अब्दुल उमर डांगे यांच्या नौकेचे नाव आयो उमर असून या नौकेवरील 30 हजार रुपयांची मासळी जप्त करण्यात आली. शौकत डांगे यांना दीड लाख रुपयांचा संभाव्य दंड ठोठावण्यात आला आहे. फतेह महंमद हुसेन मुजावर, जयगड यांची जयगडचा राजा ही नौका पकडली. या नौकेवरील 10 हजार रुपयांची मासळी पकडण्यात आली असून त्यांना 50 हजार संभाव्य दंड ठोठावण्यात आला आहे.


























































