
सामना प्रतिनिधी । मालवण
कोळंब हडकर दुकान नाक्यावरील अनिल भगवान मुंज यांचे वाघेश्वर जनरल स्टोअर्स हे दुकान चोरट्यांनी फोडून पाच मोबाईल आणि 5 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 12 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची तक्रार दुकानाचे मालक अनिल मुंज यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. कोळंब हडकर दुकान स्टॉप येथील वाघेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानाचा मागील बाजूकडील सिमेंटचा दरवाजा तुटलेल्या स्थितीत असल्याची माहिती शनिवारी सकाळी सात वाजता मुंज यांना समजताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानाच्या मागील बाजूस असलेला सिमेंटचा दरवाजा वरच्या बाजूने तुटलेल्या स्थितीत दिसून आला. दुकानातील विक्रीसाठी ठेवलेले सॅमसंग आणि ओप्पो कंपनीचे 5 मोबाईल आणि 5 हजार रुपये रोख रक्कम लांबण्यात आली होती. चोरट्यांनी दरवाजा अर्धा तोडल्यानंतर आतमध्ये हात घालून दरवाजाची कडी काढून दुकानात प्रवेश केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुकानमालक मुंज यांनी याबतची तक्रार मालवण पोलिसात दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करून अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.
























































