24 शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, धुळे

अनेर धरणाच्या पाटचारीसाठी संपादित जमिनीचा मोबदला द्यावा आणि पाटचारीत पाणी सोडावे या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील शेतकऱयांनी सोमवारी  उपअभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 24 शेतकऱयांनी मागण्यांची दखल घेतली जात नाही म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेतले. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि अनर्थ टळला.

शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांसाठी शेतकऱयांच्या जमिनी संपादित होतात. शिरपूर तालुक्यातील अनेर येथील धरणाच्या पाटचारीसाठी मांजरोद येथील शेतकऱयांच्या जमिनी संपादित झाल्या. गेल्या काही वर्षांपासून या शेतकऱयांकडून संपादित जमिनीच्या मोबदल्याची मागणी होत आहे, पण पैसे मिळत नाहीत. यंदाच्या दुष्काळी स्थितीत दिलासा मिळावा म्हणून पाटचारीत अनेर धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी मांजरोदच्या ग्रामस्थांची होती. पण पाटबंधारे विभाग या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी सोमवारी दुपारी रुद्रावतार धारण केला. शिरपूर येथील उपअभियंत्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱयांनी मागण्या ठेवल्या. परंतु उपअभियंता आणि इतर कर्मचारी दाद देत नसल्याने शेतकऱयांचा संयम सुटला. मागण्या घेऊन आलेल्या 24 शेतकऱयांनी थेट अंगावर रॉकेल ओतून घेतले. आंदोलकांपैकी कुणीही स्वतःला अग्निउपद्रव करून घेऊ नये म्हणून पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली. सर्वांना प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेतले. याबाबत आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

रॉकेल अंगावर ओतूनघेतल्याने पोलिसांची धावपळ

 संपादित जमिनीचा पैसा नाही, जमीन कसण्यासाठी पाणी नाही अशी कोंडी सरकार करत असेल तर आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून या शेतकऱयांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. अनेक शेतकऱयांनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची धावपळ झाली.