
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाच्या गर्डरच्या डागडुजीसह पादचारी मार्गिका कोसळून दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले होते.
पश्चिम रेल्वेवर पावसाळ्यातच 3 जुलै रोजी अचानक अंधेरीजवळच्या गोखले पुलाचा पादचारी मार्गिकेचा संपूर्ण भाग रुळांवरून कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यानंतर मुंबईतील रेल्वे मार्गावरून जाणार्या सर्व पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर 3.3 मीटर रूंदीचा दोन्ही दिशेकडील कॅन्टीलिव्हर स्लॅब हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर युटीलिटी वायर्स हटविण्यासह नवा गर्डर टाकण्यात आला आहे. स्टीलचे ब्रॅकेट्स, क्रॅश बॅरिअर आणि स्टेनलेस स्टीलची जाळी आणि नवीन स्लॅब टाकण्याचे काम करण्यात आले असून त्यासाठी 3.34 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
दोन टप्प्यांत काम पूर्ण
गोखले पुलाचे काम दोन टप्प्यांत करण्यात आले असून दक्षिण बाजूच्या पादचारी मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम जुलै 2018 मध्ये सुरू करण्यात आले होते, ते जानेवारी 2019 मध्ये पूर्ण झाले. या पुलाची दुरुस्ती सुरू असताना केवळ तीनचाकी रिक्षा व दुचाकींना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दुसरी उत्तर बाजू चार महिन्यांत दुरूस्त करण्यात आली.



























































