
सामना ऑनलाईन, मुंबई
ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये गुदमरलेल्या अशा शेकडो कुटुंबांसाठी खूशखबर आहे. कारण, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाची मास्टरलिस्ट आजपासून ऑनलाईन झाली असून जी कुटुंबे वर्षानुवर्षे ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहत आहेत, त्यांना या मास्टरलिस्टमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यांना मास्टरलिस्टमध्ये अर्ज करण्यासाठी एक महिन्याची म्हणजेच 16 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
जी कुटुंबे जीव मुठीत घेऊन संक्रमण शिबीरात राहात आहेत. अशा कुटूंबाना एक महीन्याच्या आत घरांसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर त्यातून पात्र आणि अपात्र अशी यादी तयार करण्यात येईल. त्यांची सुनावणी घेण्यात येईल. अनेकदा वडीलांच्या नावे घरे असतात. त्यामुळे पुढे जाऊन वडीलांचा भाऊ घरासाठी दावा करतात. त्यामुळे कायदेशीर प्रक्रीयेद्वारे संबंधितांना पात्र आणि अपात्र ठरवण्याबाबत सुनावणी घेण्यात येईल.
सेवाशुल्कही ऑनलाईन करणार
ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहाणाऱ्यांकडून म्हाडा सेवाशुल्क घेते. परंतु, म्हाडाकडे बऱ्याचदा कर्मचाऱ्यांचा तुटवडा असतो. त्यामुळे म्हाडाचे अधिकारीही ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये वेळेवर जात नाहीत. रहिवासी सेवाशुल्क भरायला तयार असतात. परंतु अधिकारी किंवा कर्मचारी त्याची रिकव्हरी करण्यासाठी जात नाहीत.परिणामी, सेवाशुल्काच्या थकबाकीचा आकडा फुगत जातो. ही थकबाकी टाळण्यासाठी सेवाशुल्क ऑनलाईन भरण्याची सुविधा जुलैच्या पहील्या आठवडयापासून सुरू होणार आहे.
मास्टरलिस्टच्या नावाखाली फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधा
दलाल मास्टरलीस्टच्या नावाखाली फसवणूक करतात. मास्टरलीस्टमधून गाळा देतो असे सांगून लोकांकडून भरमसाट पैसे उकळतात. त्यानंतर जेव्हा हीच लोकं आमच्याकडे सर्व पेपर घेऊन येतात तेव्हा असा कुणीही भाडेकरूच अस्तित्वात नाही हे सिध्द होते. अखेर फसवणुक झाल्याचे संबंधित ग्राहकांच्या लक्षात येते. संबंधित दलाल बनावट पेपर तयार करतात आणि फसवणूक करतात.अशा बऱ्याच तक्रारी म्हाडकडे आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. अशा फसवणूक झालेल्यांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. म्हाडाची लॉटरी ऑनलाईन झाल्यामुळे लॉटरीबाबत म्हाडाकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण शुन्यावर आले. तशीच आता म्हाडाची मास्टरलीस्टही ऑनलाईन झाल्यामुळे फायलींचा भ्रष्टाचार बंद होईल असा विश्वास विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केला.
मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुर्नरचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते मास्टरलीस्टवरील भाडेकरू आणि रहिवाशांसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याच्या ऑ़नलाईन प्रक्रीयेला आजपासून सुरुवात झाली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुर्नरचना मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते.
कोण अर्ज करू शकतात
ज्यांना 1 जानेवारी 2017 नंतर मास्टरलिस्ट कमिटीने पात्र घोषित केले आहे अशा व्यक्तींनी नव्याने अर्ज दाखल करू नये.
ज्यांनी यापूर्वी मास्टरलिस्टसाठी अर्ज केलेला आहे, परंतु त्यांचे प्रकरण अद्यापि प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी पुन्हा ऑनलाइन अर्ज करावेत.
ज्या अर्जदारांना यापूर्वीच्या मास्टरलिस्ट कमिटीने अपात्र घोषित केले आहे, मात्र याविरोधात त्या अर्जदारांना आक्षेप दाखल करायचा आहे त्यांनाही अर्ज करावा लागेल.
फाइलचे स्टेटस एका क्लिकवर
मास्टरलिस्टमध्ये अनेकदा फाईल्स गहाळ होत होत्या. अनेक फाईल्स या टेबलवरून त्या टेबलवर फिरत राहायच्या. आपली फाईल नेमकी कुठे अडकली, आपल्या घराचे काय झाले याबाबतची माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात खेटे घालावे लागत होते. पण, आता संबंधित भाडेकरू आणि
रहिवाशांना त्यांच्या गाळय़ांची किंवा घरांबाबतच्या फाईल्सची माहिती एसएमएसवर मिळेल, असे मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले.






























































