
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईच्या विकास आराखडय़ात 1 लाख कोटीचा घोटाळा झाला असून त्यातून 10 हजार कोटी रुपये मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्याचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे-पाटीलच आता गृहनिर्माण खात्याचे मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनीच त्यांच्या या आरोपांवर खुलासा करावा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. भाजप सरकारला ठग्ज ऑफ हिंदुस्थान म्हणणारे विखे-पाटील भाजपच्या ठगांमध्येच कधी जाऊन बसले ते कळलेच नाही, अशा शब्दांत टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवार यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत जोरदार टोलेबाजी केली. जलयुक्त शिवार योजनेत 5 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्यांनी केला, त्यांनाच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात जागा दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरणही देण्यासाठी सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. तुम्ही केलेल्या आरोपांना आता तुम्हीच मंत्री म्हणून उत्तरे द्या, अशी उपरोधिक टीका पवार यांनी केली.
अंकगणिताच्या नवीन पद्धतीवरून सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना अजित पवार यांनी शिक्षण विभागाच्या प्रयोगाची चांगलीच खिल्ली उडवली. ‘आता मोबाईल नंबर कसा बोलायचा, 9892 कसं म्हणायचं? 90 वर 8, 90 वर 2 असं म्हणायचं का? आता ऊर्जामंत्री बावनकुळे कसं म्हणायचं? विसपुते… यांना 20 वर शून्य पुते, अशी हाक मारायची का आम्ही, असा सवाल अजित पवार यांनी केला.
मुदत संपलेल्या बीअरची विक्री
राज्यात मुदत संपलेल्या बीअरच्या बाटल्यांवर पुन्हा स्टँप मारून विक्रीला परवानगी दिली जात असल्याचा ठपका लोकलेखा समितीच्या अहवालात ठेवला आहे. मुदत संपलेल्या बीअरच्या स्टॉकवर पुन्हा प्रक्रिया करण्याची परवानगी अजून सरकारने दिलेली नाही, असेही निरीक्षण लोकलेखा समितीने नोंदवले आहे.


























































