पडघवलीची मनःस्पर्शी कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजया वाड

गो.नि. दांडेकरांच्या बाळबोध लेखणीतून पाझरणारी कोकणची लाल माती मनात घर करून राहते.

सारस्वत’ या सदरातून मी ‘ओल्ड क्लासिक्स’ का मधून मधून सादर करते? नव्या पिढीला या अभिजात साहित्याची ओळख व्हावी म्हणून. गोपाल नीलकंठ दांडेकर हे आमच्या पिढीचे दैवत होते.

‘पडघवली’ वाचाल तर कोकणी भाषा, कोकणी माणूस आणि कोकणचा मोहक निसर्ग याचे मनोहारी दर्शन तुम्हाला पानोपानी घडेल. तुम्ही कोकणी असाल तर तुमची छाती अभिमानाने फुलेल. देशावरले असाल तर हे अक्षरकोकण तुम्हाला कोकणाची मनस्वी ओढ लावेल. अप्पा हे गोनीदांचे घरातले नाव. आपल्या अर्पण पत्रिकेत ते म्हणतात, जिच्या साहाय्यावाचून हे शब्दचित्र अपुरे राहिले असते. त्या माझ्या आईस- त्यांच्याच मताप्रमाणे, पडघवली ही कादंबरी नव्हे, ते एका नष्ट होऊ घातलेल्या खेडय़ाचे प्रतिबिंब आहे, शब्दचित्र आहे, कारखाने आणि उद्योगधंदे यांचे केंद्रीकरण झाल्यामुळे खेडय़ातील नवसर्जनशील मनुष्यशक्तीचे शहरात जे विलीनीकरण होत आहे, ते भयानक आणि शहरी माणसाला चिंतीत करणारे आहे. ‘पडघवली’ या सर्व मरगळ आलेल्या खेडय़ांची प्रतिनिधी आहे.

लेखकाची मनोभूमी ही त्याने रेखाटलेल्या शब्दचित्रांचे खऱया अर्थाने प्रतिबिंब असते. तो जितका ‘अस्वस्थ’ तितके त्याचे शब्दचित्र प्रत्ययकारी. अर्धा अधिक भारत भटकलेले गोनीदां यांनी खेडी फार जवळून न्याहाळली आणि दिसले काय ? तर उद्ध्वस्त झालेली ग्रामव्यवस्था.

पूर्वपरंपरेने चालत आलेले व्यवसाय सोडून माणसे नव्या व्यवसायाकडे वळत आहेत. ही पडझड आहे का? हे इष्ट की अनिष्ट ? प्रत्येक पिढीची याबद्दलची मते वेगवेगळी असतील. गोनीदां मात्र व्यथित आहेत. ‘अत्यंत विकल अवस्थेत लिहिलेली कविता, आकाशीची वीज कोसळून ह्रदय जाळीत आलेली कविता, इतरांच्या ह्रदयावर राज्य करिते’ असे कवी केशवसुत म्हणतात तसेच हे शब्दकाव्य आहे गोनीदांचे पडघवली!

यातही नायिका अंबू हिचे सासरघर हल्ली पंचवीस तीसच्या घरात मुलींचे लग्न होते. भरमसाठ शिक्षण नि माहेरची ओढ त्याबरोबर घेऊन येतात, पण गोनीदांची ‘अंबू’ आठवे वरीस असताना लगीन करून पडघवलीस आली आहे. माहेर दाभोळ खाडीपासून आत आठ-दहा कोस लग्नाची वरात मेण्यातून! शेजारी जरीची टोपी नि काजळ घातलेला नवरा, गंमत वाटते हे अनोखे वर्णन वाचताना. वाटेत अंबूला मेण्यातच झोप लागते. आतेसासूबाई बाव्हटय़ाला धरून प्रेमाने उचलतात. डोळ्यांना पाणी लावतात. पोटाशी घेऊन म्हणतात, ‘बावरू नकोस हो पोरी, सासरी आल्येस तू, पडघवलीला !’ ही अंबूची पहिली ओळख पडघवलीची! अंबूचा महादेव तिला घेऊन आलाय इथं.
सासू म्हणजे खवदूस! सूनेला पाण्यात बघणारी… या सर्वदूर आणि सर्वकाळ पसरलेल्या कल्पनांना छेद देणारी अंबूची प्रेमळ आतेसासू हा या कादंबरीतला विसाव्याचा थांबा आहे. चौथ्या वर्षी लग्न होऊन सासरी गेलेली, नि नवरा जाताच माघारी आलेली दहाव्या वर्षी हे माडावरून कोसळले नि सारं संपलं. मी रडत रडत घरी परतल्ये. हे वाक्य मनाला अस्वस्थ अस्वस्थ करतं. रितीरिवाज, सण, गणगोत, त्यातले भावसंबंध, पडघवलीतल्या बाराच घरांचे एक विशाल कुटुंब, सूक्ष्म रितीने लेखक गोनीदां चितारतात. बोली भाषा अस्सल कोकणी बाजाची असल्याने शेवटपर्यंत वाचल्यावर आपल्या कानामनात ती भाषा गुंजत राहते. सगळ्या गावाला देती राहिलेली आत्तेसासू माणूसपणाचा धडा गिरवायला प्रत्येकास उपयोगी पडावी.

बाळंतपण करणारी आतेसासू समजून घेते तो कादंबरीतला भाग ‘बाईच्या जिण्याला’ एक वेगळं परिमाण देतो.

आपलं माणूस जेव्हा आपलं राहात नाही, तो प्रसंग तर कादंबरीचा कळसाध्याय आहे. महादेवाचं आक्कीला नासवणं, आक्कीचं छातीशी छोंडे मारून, बांधून, जीव देणं सारंच अंबूच्या आयुष्यातलं आक्रीत आणि पुरुषाच्या स्वभावातील हीण आहे. आतेसासूबाई आक्की गेल्यानं जीवाला घोर लावतात नि अंथरुण पकडतात, हळहळत राहातात. ‘मीच मारली पोरीला. अगोदरच म्हाद्याला चूप करत्ये तर…’

पाटाच्या पाण्याची ‘अडवलेली’ कहाणी बाया-बापडय़ा कशी मोकळी करतात. तो भाग ह्रदयस्पर्शी झालाय. अंबू कागदावर राहात नाही मग! लार्जर दॅन लाईफ होते. पडघवलीच्या यादोकाकीचं मरण अंबूला कोसळून टाकतं. वासरीचा जीव वाचवता मेली ? झाडं वादळी मोडलं नि छातीवर पडलं? वासरीची दोरी हातात? आबा, अंबूचा मुलगा, मुंबईस! तुटलेली अंबू मुंबैस निघते. पडघवली सोडून तिथून जाऊ काशीस! पडघवली आता बघवत नाही. तिची पडझड साहवत नाही. मामंजी, आतेसासू, पती नि त्यांच्यामागे पडघवलीही सोडू? बोजे खाली काढणारे गणूभावजी म्हणतात, ‘वहिनी पडघवली सोडून जायचं नाही म्हणत्ये…’ कादंबरीतली पडघवली मग मनभर उरते.

पडघवली
लेखक – गोपाळ निळकंठ दांडेकर
प्रकाशक – मौज प्रकाशन गृह, मुंबई
पृष्ठ – 22