गोव्यात मान्सूनचे आगमन; पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवडयात केरळ, कर्नाटकमार्गे गोव्यात येणारा मान्सून यंदा तब्बल दोन आठवडयानंतर गोव्यात दाखल झाला आहे. गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी गोव्यात मान्सून दाखल झाला असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. गोव्यात गुरुवारी दाखल झालेल्या मान्सूनने पुढील वाटचाल कायम राखत महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि कोल्हापुरचा टप्पा ओलांडला आहे. येत्या पाच दिवसात गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही वेधशाळेने दिला आहे.

दरवर्षी जूनच्या 7 तारखेपर्यंत गोव्यात येणारा मान्सून यंदा अंदमानातून केरळमार्गे रखडत रखडत 14 जून रोजी मेंगलोरमध्ये दाखल झाला. वायू चक्रीवादळाने मान्सूनला पुढे सरकण्यासाठी तयार झालेले पोषक वातावरण बिघडवल्याने मान्सून रखडला होता. वातावरणातील आद्रता वायू वादळासोबत गेल्याने मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर पडले होते. दोन दिवसांपासून पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मेंगलोरमध्ये 6 दिवस रेंगाळलेल्या मान्सूनचे गुरुवारी गोव्यात आगमन झाले. मान्सून दोन आठवडे उशिरा दाखल झाला असला तरी उर्वरित दिवसात पाऊस दरवर्षीची सरासरी भरून काढेल, असे वेधशाळेने सांगितले आहे. गेल्या 20 वर्षात प्रथमच मान्सूनच्या आगमनाला इतका विलंब झाला असल्याचे पडगलवार यांनी यावेळी सांगितले.