
सामना प्रतिनिधी । बीड
धारूर तालुक्यातील कुंडलिका तलावाच्या मध्यभागी असलेले पुरातन शिंवलिंग या वर्षी पाणी पातळी कमी झाल्याने पहिल्यांदाच दिसून आले आहे.
धारूर वडवणी तालुक्याच्या वेशीवर असलेत्या कुंडलिका तलावाच्या कामाला १९७२ मध्ये स्व. सुंदररावजी सोळंके यांच्या हस्ते सुरूवात झाली होती. या कुंडलिका तलावाचे काम १९९० ते १९९२ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या ठिकाणी नागझरी हे गाव होते. या गावात पुरातन महादेवाचे मंदिर होते. मंदिरासमोर गायमुखात पाण्याचा भरपूर उद्भव होता. या ठिकाणी अनेक भाविक दूरदूरवरून यायचे. परंतु हे संपूर्ण गाव तलावाकरीता स्थलांतरीत झाल्यानंतर गावाच्या ठिकाणी तलावाची निर्मिती झाली होती.
या वर्षी पाण्याची पातळी प्रचंड खालावली आणि पाण्याखाली गेलेल्या गावातील भग्नावशेष व मंदीराच्या खाणाखुणा, प्राचीन शिवलिंग वर आले आले आहे.






























































