मुंबईत बॉक्सिंगचा ‘पंच’ मारायचाय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

विजेंदर सिंग आणि मेरीकोम वगळता हिंदुस्थानची ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगची पाटी तशी कोरीच. मात्र नुकत्याच पार पडलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी चीन व कझाकिस्तानच्या खेळाडूंना बॉक्सिंगच्या रिंगणात धूळ चारत उज्ज्वल भविष्याची चाहूल दिली. याचदरम्यान हिंदुस्थानी बॉक्सिंग फेडरेशनचे महासचिव जय कवळी यांची आशियाई बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड झालीय. त्यामुळे हिंदुस्थान बॉक्सिंगमध्ये झेप घेऊ लागलाय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत जय कवळी यांनी मुंबईतून अव्वल दर्जाचे बॉक्सिंग खेळाडू घडावेत, अशी इच्छा बोलून दाखवली.

आशियाई बॉक्सिंग कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जबाबदारी आणखी वाढलीय. काय सांगाल?
– सध्या हिंदुस्थानी बॉक्सिंग फेडरेशनच्या महासचिव पदी कार्यरत आहे. आता आशियाई बॉक्सिंग कार्यकारी समितीच्या सदस्य पदी निवड झालीय. अशा प्रकारची ‘दुहेरी’ जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. 36 देशांपैकी 23 प्रतिनिधींनी मला मतदान केले. मी कोणताही प्रचार केला नाही. तरीही मला निवडून देण्यात आले. या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान माझ्यासमोर असेल. त्यामुळे दबावही असेल हेही निश्चित आहे.

बॉक्सिंग या खेळात मुंबईसह महाराष्ट्र प्रगती करील अशी काही योजना आखलीय का?
– बुवा साळवी यांनी कबड्डी या मातीतल्या खेळाला मोठे केले. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवलाय. बॉक्सिंगमध्ये मुंबई, महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल होईल याकरिता जिवाचे रान करतोय. याआधी मुंबईत बॉक्सिंगची एकच रिंग होती. आता हा खेळ महाराष्ट्राच्या 27 जिह्यांपर्यंत पोहोचलाय. तसेच याप्रसंगी 55 रिंग या राज्यात उपलब्ध आहेत. संघटनेतील पदाधिकारी, सदस्य यांच्या ‘टीमवर्क’मुळे बॉक्सिंगमध्ये यश संपादन करता येतेय.

संघटनांतील वादाचा फटका या खेळाला बसतोय असे वाटते का?
– गेल्या काही काळात वादाचा फटका बॉक्सिंगला बसलाय. पण आता यापुढे सर्वकाही सुरळीत होईल. कारण प्रदीर्घ काळ खुर्चीवर बसलेल्यांमुळे बॉक्सिंग संकटात सापडले होते. आता वू चिंग हे आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्ष पदी नाहीत तसेच अभय चौटाला हेही हिंदुस्थानी संघटनेच्या बाहेर गेले आहेत.

सध्या खेळाडूंचा ओढा हा प्रोफेशनल बॉक्सिंगकडे असतो. याचे विपरीत परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील का?
– प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये खेळाडूंना जास्तीत जास्त पैसे मिळतात. त्यामुळे त्यांची पावले त्याकडे वळत आहेत. मात्र प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये वयस्कर खेळाडू जात आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. प्रोफेशनल व ऍमॅच्युअर बॉक्सिंग या दोन्हींमधील रेषा धुसर होऊ लागलीय. याचा फटका ऍमॅच्युअर बॉक्सिंगला बसणार नाही. कारण युवा खेळाडू आधी देशासाठी खेळताहेत. त्यानंतर ते प्रोफेशनल बॉक्सिंगकडे जातात.

मेरीकोमच्या बॉक्सिंगमधील कामगिरीबाबत काय वाटते?
– पेले, सचिन तेंडुलकर, लियोनेल मेस्सी या महान खेळाडूंच्या पंक्तीत मेरीकोमला स्थान आहे. हे एक वेगळेच रसायन आहे असे म्हटले तरी चालेल. मेरीकोमच्या कारकिर्दीची पहिली ‘बाऊट’ झाली तेव्हा मी रेफ्री होतो. त्यामुळे मलाही त्याचा आनंद आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला बॉक्सिंगमधून पदकांची लयलूट करता येईल का?
– टोकियो ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे. खेळाडूंसाठी 300 दिवसांचा कॅम्प लावण्यात आलाय. परदेशी प्रशिक्षकांची निवड करण्यात आलीय. प्रतिष्ठsच्या स्पर्धांमधील बॉक्सिंग या खेळात हिंदुस्थानी खेळाडू नक्कीच पदकांची लयलूट करतील एवढा विश्वास आहे.

कोणते ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे?
क्रिकेट या खेळाला मुंबईतून अव्वल दर्जाचे खेळाडू मिळालेत. मुंबईतून देशाला घवघवीत यश मिळवून देणारे बॉक्सिंगपटू घडवावेत ही इच्छा मनात बाळगली आहे. कांदिवलीच्या भावेश कट्टीमनीने सर्वच स्तरावर आपली धमक दाखवलीय. सुरुवात तर छान झालीय. आता चरहाटे, लोहे, गाडगे, मिलिंद सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या साथीने मुंबईत बॉक्सिंगला पुढे न्यायचेय.

[email protected]