
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रोहा तालुक्यातील नागोठणे वेलशेत येथील अंबा नदीच्या पात्रात एक जण बुडल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे. विठोबा ताडकर (45) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ताडकर यांचा शोध सुरू होता. 12 तासाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
नागोठणे वेलशेत येथे राहणारे विठोबा उर्फ़ बाळूताडकर हे काल शुक्रवारी 21 जून रोजी अंबा नदी पात्रात जाळे घेऊन मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या सोबत त्याचा एक मित्रही होते. नदी पात्रात मासेमारी करताना ताडकर याना पाण्याच्या अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी त्याच्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीचा प्रवाह जास्त असल्याने वाचविणे शक्य झाले नाही.
त्यानंतर ही घटना ग्रामस्थ व पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी येऊन ताडकर यांचा शोध सुरू केला. रात्री एक वाजेपर्यत ताडकर यांचा शोध घेण्यात आला मात्र काळोखामुळे मृतदेह सापडला नाही. त्यानंतर आज पहाटे पुन्हा शोध सुरू केला असता सकाळी सात वाजता मृतदेह काढण्यात यश आले.



























































