
राजकुमार भगत । न्हावाशेवा
ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणाऱ्या १९३०च्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चिरनेर स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकावरील पत्र्याच्या शेडची पडझड झाली असून ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलना अंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी महात्मा गांधींच्या हाकेला हाक देत उरण आणि पनवेल पंचक्रोशीतील जनतेने चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानात २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रहच्या आंदोलनाला सुरूवात केली होती. त्यावेळी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या जंगल सत्याग्रहात उरण परिसरातील शेतकरी, आगरी, कोळी, कराडी, आदिवासी तसेच विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. अक्कादेवीच्या माळरानाकडे निघालेल्या या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलीसाने निर्दयपणे बेछुटपणे गोळीबार केला.
या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली),रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) हे आठ हुतात्मे धारातीर्थी पडले. तर ३८ आंदोलक जखमी झाले होते. चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्म्य पत्करणाऱ्या शुरवीरांच्या आठवणीना या परिसरात ये-जा करणा-या नागरिकांना, पर्यटकांना स्मरण व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेतर्फे हुतात्मा स्मारका समोर हुतात्म्यांचे शिल्प स्मारक उभारण्यात आले होते. 2005 साली मान्यवरांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले होते.
मात्र हे पुतळे उभारल्यानंतर त्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे या पुतळ्यांची दुरवस्था झाली आहे. फायबर धातूचे असलेल्या या पुतळ्यांवर उन आणि पावसाचा परिणाम होऊन ते तुटण्याचा धोका असतो. या पुतळ्यांना उन, पावसाचा त्रास होवू नये यासाठी तेथे पत्र्यांची शेड उभारण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शेडचे पत्रेही निखळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या शेडची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.

























































