रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायत निकालात शिवसेना-भाजपला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी तहसीलदार कार्यालयात झाली. आठ ग्रामपंचायत निकालांमध्ये शिवसेना भाजपने 6 ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखले असून शेकापला दोन ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. 23 जून रोजी अलिबागमधील वरसोली, चेंढरे, पेण तालुक्यातील रावे, उरण तालुक्यातील गोवठणे, आवरे, पनवेल तालुक्यातील चावणे, जंभिवली, कराडे खुर्द या आठ सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवार 24 जून रोजी आठ सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजता तहसीलदार कार्यालयात सुरू झाली.

अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेच्या असलेल्या वरसोली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पुन्हा भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या प्रमिला भाटकर या 529 मताने सरपंचपदी निवडून आल्या. तर शिवसेनेचे 13 सदस्य निवडून आले असून शेकापला दोनच जागेवर समाधान मानावे लागले आहे. चेंढरे ग्रामपंचायत शेकापने राखली असली तरी शेकापच्या स्मिता पाटील या अवघ्या 194 मताने विजयी झाल्या. शिवसेना भाजप प्रणित आघाडीने झुंज देऊन आपले चार उमेदवार सदस्यपदी निवडून आणले. पेण तालुक्यातील माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्या रावे ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ खुलले आहे. तर पनवेलमध्ये चावणे ग्रामपंचायत शेकाप, कराडे खुर्द भाजप व जांभवली ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. उरण तालुक्यातील गोवठणे व आवरे या दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. ग्रामपंचायत निकालाच्या दृष्टीने मतमोजणी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.