
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी कसा होईल याचा निर्णय घेतल्याबद्दल महापालिका आणि समितीचे आभार मानण्यासाठी, त्यांना ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी आज मी आलो आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी आज बेस्ट हाऊसला भेट दिली. तसेच बेस्टचा नवीन भाडे रचना प्रस्ताव समितीने मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानून अभिनंदन देखील केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असे म्हणता येणार नाही. कारण तसे असते तर लोकसभेवेळीच आम्ही तसा निर्णय घेतला असता. तसेच ते म्हणाले की मुंबईकरांसाठी काय आवश्यक आहे त्याचा अभ्यास करून, प्रक्रिया पूर्ण करून बसेसची संख्या 3000 हून 6000 हजार पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यातील जास्तीत जास्त बस एसी बस असाव्यात असा प्रयत्न आहे. तसेच 500 इलेक्ट्रीक बस आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच बेस्ट बसच्या मार्गांचा देखील विचार सुरू आहे. नवे मार्ग शोधले जात आहेत. छोट्या मार्गांवर फेऱ्या वाढवणे, फेरीबस वाढवणे, फोर्ट फेरी बस आहे तिथे क्षमता वाढवू शकतो का हे देखील तपासणे सुरू आहे आणि हे करत असताना प्रत्येक प्रवासाठी पास, किमान भाडे कमी करणे हे महत्वाचे होते. तो प्रस्ताव आज मंजूर झाला आहे. किमान भाडे 5 रुपये करण्यात आले आहे. ज्यामुळे बेस्टने प्रवाशांची सख्या अधिकाधिक वाढेल. लोकांना सार्वजनिक वाहनांनी प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कसा करू शकू, त्यामुळे रहदारीचा प्रश्न कसा कमी करू शकू याच्यावर अभ्यास करण्यावर जोर देणे जास्त गरजेचे आहे.
विधानसभेची तयारी शिवसेनेची तयारी पाचवर्षांपासून सुरू!
विधानसभेची तयारी शिवसेनेची तयारी पाचवर्षांपासून सुरू आहेच. कोणत्याही पक्षाची निवडणुकीची तयारी ही सतत सुरूच असते. तसेच शिवसेनेचे आहे. काम करणं आणि निवडणुका आमच्या परीक्षा आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मी पहिल्यापासून आक्रमकच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






























































