भोकरदन परिसरात जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भोकरदन

जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरासह परिसरामध्ये आज शुक्रवार २८ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला असून परिसरातील शेकडो एकर शेतीमध्ये पाणी साचले असून लागवड केलेले बियाणे तसेच उगवलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आज दुपारी तीन वाजेदरम्यान अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे भोकरदन परिसरातील मासनपुर, फत्तेपूर, चोराळा, आन्वा पाटी, विरेगाव, मनापुर, भायडी, दानापुर, निंबोळा, ताडकळस, शिपोरा बोरगाव, दावतपुर टाकळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून या भागातील शेकडो एकर शेत जमिनीवर तुडुंब पाणी तुंबण्याचे चित्र पहावयास मिळाले असून या जोरदार झालेल्या पावसामुळे दोन दिवसांपूर्वीच लागवड केलेले बियाणे तसेच उगु लागलेले बियाणे तूर्तास वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे पडलेल्या या पावसामुळे परिसरातील विविध नाल्यांना पूर आला होता.

असून असंख्य ठिकाणच्या जमिनीतील बियाणे दबल्याने ते उगवणार नसल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. विशेषतः एकीकडे सलग तीन ते चार वर्षांपासून या तालुक्यात पडत असलेल्या कोरड्या दुष्काळामुळे वैतागलेले शेतकरी पावसामुळे दुबार पेरणी झाली तरी चालेल मात्र पाऊस पाहिजेच अशी भावना देखील व्यक्त करताना दिसून येत आहे.