
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे.अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्याने रहिवाशांना विद्युत पुरवठा करणारे मीटर तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत. नागाव गावातील रहिवाशांच्या घरावर झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरण तहसिल कार्यालयाकडून हाती आली आहे.
शुक्रवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उरण मधील जनजीवन विस्कळित झाले होते. उरण तहसिल,उरण नगर पालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग,सिडको, जेएनपीटी, आपत्तकालीन व्यवस्थापन तसेच संबंधित खात्याच्या प्रशासनाने पावसाळी पाणी निचऱ्याची व्यवस्थाच न केल्याने उरण शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले तसेच भाजी मंडई,व्यवसायिकांच्या दुकाना मध्ये पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली. उरण पनवेल या रस्त्यावरील काही भागात पावसाचे पाणी साचले, तसेच सोनारी, जासई गावात देखिल सखल भागात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
यासंदर्भात उरण तहसिल कार्यालयाकडे विचारणा केली असता नूकसान ग्रस्तांचे पंचनामे सुरू आहेत.तसेच उरण तहसिलदार कल्पना गोडे यांना उरण मधिल पावसाळ्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपला मोबाईल फोन उचलला नाही. तसेच महावितरण कंपनीचे अभियंता हरिदास चोंडे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे समजते. एकंदरीत उरण तालुक्यात पावसाने थैमान घातले असताना आपातकालीन व्यवस्थापनाचे अधिकारी जागेवर हजर नसणे म्हणजे उरण तालुक्यात आपत्तकालीन व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला तर नाही ना असा प्रश्न उरणच्या रहिवाशांसमोर उभा ठाकला आहे.



























































