
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवणात सलग चार दिवस कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी पाचव्या दिवशीही तालुक्याला झोडपून काढले. पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून तालुका जलमय झाला आहे. दरम्यान, अजगणी येथील सहदेव गोविंद चव्हाण आणि कट्टा येथील विजया विजय महाडेश्वर यांच्या घरावर झाडे कोसळुन हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी सकाळी तर ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट करत आलेल्या वरुण राजाने मालवणला झोडपून काढले. अजगणी येथील सहदेव गोविंद चव्हाण यांच्या घरावर झाड पडल्याने सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कट्टा येथील विजया विजय महाडेश्वर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. आंब्याचे झाड घरावर पडत असताना या झाडाने घरालगतच्या माडालाही दणका देत तो जमीनदोस्त केला. मालवणात सकाळी 8 वाजेपर्यंत 61 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली.



























































