
सामना प्रतिनिधी । बर्मिंगहॅम
यजमान इंग्लंडची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीची वाट बिकट बनली असून आता त्यांच्या मार्गात उद्या (दि. 30) हिंदुस्थानचा अडथळा असेल. कारण एक पराभवही यजमानांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे विजयरथावर आरूढ असलेली विराट कोहलीची भगवी सेना इंग्लंडचा फडशा पाडून उपांत्य फेरी गाठून निश्चिंत होण्यासाठी आतुर झाली आहे.
हिंदुस्थान 11 गुणांसह गुणतालिकेत दुसऱया स्थानावर, तर ऑस्ट्रेलिया 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडच्या खात्यात 8 गुण असून ते चौथ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान व श्रीलंका संघांकडून अनपेक्षितपणे पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंडची वाटचाल अवघड बनली आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी यजमानांना उर्वरित दोन लढती जिंकाव्याच लागतील.
खेळपट्टी आणि हवामान
उद्या लख्ख प्रकाश पडणार असल्याने सुकलेल्या खेळपट्टीवर चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उभय संघ दोन-दोन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. काही वेळ ढग जमा होतील, पण पाऊस पडणार नाही असा स्थानिक वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे दोन मनगटी गोलंदाज आणि जसप्रीत बुमराह यांचा प्रतिकार करताना इंग्लंडची दमछाक होऊ शकते.
आजची लढत
हिंदुस्थान वि. इंग्लंड (बर्मिंगहॅम)
थेट प्रक्षेपण दुपारी 3 पासून

























































