
सामना प्रतिनिधी । नगर
जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर असतानाच प्रशासनाने नगर तालुक्यातील चारा छावण्या बंद करण्याचे तोंडी आदेश दिल्यानंतर सोमवारी त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी तहसिलदारांच्या दालनासमोर जावून जाब विचारण्यास सुरवात केली आहे. छावण्या सुरु झाल्या नाहीत तर नगर-सोलापूर महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला. त्यानंतर प्रशासनाने साकत गावात जाऊन परिस्थिती पाहणी केली आणि सध्या चारा छावण्या बंद न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर, राजेंद्र भगत, प्रवीण गोरे, किशोर पवार, संपत वाघमोडे, माणिक गोरे, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हयामध्ये जनावरांच्या छावण्यासाठी मोठी कसरत करावी आहे. दिलेल्या परवानग्या लालफितीच्या कारभारात अडकल्या होत्या. त्या परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यानंतर रडतखडत कशाबशा चारा छावण्या सुरू झाल्या. जिल्ह्यात सुमारे 500 छावण्या सुरू होत्या. सध्या जिल्ह्यात चार्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जिल्हयात पावसाला सुरवात झाली असली तरी अजून सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली नाही. नगर तालुक्यातील अनेक गावे यामध्ये चिचोंडी, साकत, दहिगाव, रुईछत्तीशी, हात वळण, गुणवडी , वडगाव तांदळी आदींसह विविध भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाची सुरवात झाल्यावर प्रशासनाने 44 छावण्या बंद केल्या होत्या. अजून खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली नसताना जिल्हा प्रशासनाने थेट छावण्या बंद करुन एक प्रकारे शेतकर्यांना अडचणीत आणले आहे.
दोन दिवसापूर्वीच शिवसेनच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन चारा छावण्या जुलैअखेर पर्यंत सुरु ठेवाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, नगर तालुक्यातील छावण्या बंद कराव्यात असे तोंडी आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी सोमवारी करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी येथील तहसिल कार्याल्यासमोर जमा होवून तहसिलदारांना जाब विचारण्यास सुरवात केली आहे. छावण्या सुरु झाल्या नाही तर सोलापूर महामार्गावर शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर नायब तहसिलदार अभिजीत बारवकर यांनी साकत गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. चारा टंचाई असल्याने व समाधानकारक पाऊस नसल्याने चारा छावण्या तुर्त बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
























































