पंचशील नगर एसआरए प्रकल्पात अनियमितता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

चेंबूर येथील पंचशील नगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली. तसेच रहिवाशांच्या मागणीनुसार बुद्धविहार तसेच येथील उर्वरित पात्र रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, मंगेश कुडाळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 933 झोपडय़ांचा अंतर्भाव होता. यात 659 निवासी, वाणिज्य/दुकाने 38, संयुक्त 5 व धार्मिक स्थळे 2 अशा एकूण 703 झोपडय़ा पात्र आहेत व 218 अपात्र आणि 12 अनिर्णीत आहेत. विकासकांनी  फक्त 560 पात्र रहिवाशांना घरे दिली असून अद्याप 143 सदनिकांचे काम पूर्ण होणे बाकी असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांनी आपण या प्रकल्पाला वैयक्तिकरीत्या भेट देणार का, तसेच या प्रकल्पात झालेल्या अनियमिततेची चौकशी करणार का आणि बुद्धविहाराला स्वतंत्र जागा देऊन बांधणार का असे प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री वायकर यांनी येथील उर्वरित पात्र रहिवाशांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात येईल, तसेच बुद्धविहारही त्याच ठिकाणी बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले.

महानंदानगर सहकारी गृहनिर्माण प्रकल्पात गोंधळ,दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

कुर्ला येथील महानंदानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना दिले.

विधान परिषद सदस्य भाई गिरकर यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. या योजनेत 115 झोपडपट्टीधारक असून त्यापैकी 109 सभासद पात्र आहेत. संस्थेच्या परिशिष्ट-2 मध्ये 1992 ते 2004 पर्यंत मृत व्यक्तींना हयात असल्याचे दाखवले. 18 जानेवारी 2013 मध्ये या संस्थेला भोगवटा प्रमाणपत्र देताना बांधकामाचा दर्जा तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आले. संस्थेनेही भोगवटा प्रमाणपत्र देताना उपमुख्य अभियंत्याने हरकत प्रमाणपत्रही घेतले नसल्याची माहिती त्यांनी सभागृहात देत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यावर राज्यमंत्री वायकर यांनी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष जागी भेट देऊन त्याची पाहणी करण्यात येईल. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.