
सामना प्रतिनिधी । हिंगोली
जिल्ह्यातील हिंगोली ते नांदेड राज्य मार्गावरील शिवणी खुर्द पाटीजवळ भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत हिंगोली ते पुसद मार्गावरील भटसावंगी तांडा येथे बसच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने मंगळवार हा जिल्ह्यात अपघातवार ठरला आहे.
हिंगोली ते कळमनुरी या राज्य मार्गावरील शिवणी खुर्द पाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ए.पी. ०७ टीएच ७४२९ या क्रमांकाच्या ट्रकने एम.एच. २०-८४२० या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सोहन नागेश काजळे (५) व संतोष मारोती काजळे (२२) रा. सालेगाव या दोघांचा गंभीररित्या जखमी झाल्याने जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले.
या अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना समजताच पोलीस नायक गोपाल गायकवाड, पवार, भुरेवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन कळमनुरी येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
तर दुसऱ्या घटनेत कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील आकाश खांडेकर हे जी.जे. ९५-डीआर १९२० या क्रमांकाच्या दुचाकीवरुन सिरसम मार्गे भटसावंगी येथे सासरवाडीला जात असतांना राज्य परिवहन महामंडळाची एम.एच. ४०-८२३५ क्रमांकाच्या पुसद डेपोच्या बसची दुचाकीस धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील आकाश खांडेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन अडकली. तर दुचाकीचा चेंदामेंदा झाला असुन या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे पीएसआय तायवाडे व राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याचे प्रक्रिया सुरु असल्याचे पीएसआय तायवाडे यांनी सांगितले.




























































