कळंबोली शाळेजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या तीन आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

कळंबोलीतील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या एका भिंतीलगत स्फोटके (बॉम्ब) ठेवल्याप्रकरणी नवीमुंबई पोलिसांनी तीन आरोपींना सोमवारी अटक केली आहे. सुशिल प्रभाकर साठे (35) रा. हवेली, कोंढवा धावडी जि. पुणे, मनिष लक्ष्मण भगत (45) रा. उलवे, नवी मुंबई आणि दिपक नारायण दांडेकर (55) रा. कोंबडभूजे ता. पनवेल अशी या आरोपींची नावे आहेत.

कळंबोली येथील सुधागड एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेसमोर 17 जून रोजी या आरोपींनी बॉम्ब ठेवला होता. आरोपींनी हे कमी क्षमतेचा स्फोट घडवून अर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये दहशत निर्माण करून त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने केला असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. आरोपींनी स्फोटक (बॉम्ब/एलईडी) बनविण्यासाठी अमोनिअम नायट्रेट व जिलेटिनचा वापर केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरचा बॉम्ब आढळून आल्यानंतर नवी मुंबई, मुंबईत खळबळ माजली होती. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास करण्यास सुरूवात केली होती. नवी मुंबई पोलीस व एसआयटी ने 17 दिवस सतत तपास करून आरोपींना शिताफिने अटक केली आहे. आरोपींकडून एक अलार्म घड्याळ, गोल प्लास्टिकचा डबा, पेट्रोलने भरलेला कॅन, बॅटरीसह बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य, बॉम्ब ठेवण्यासाठी वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल व मोबाईल फोन आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सहा वेगवेगळी पथके नेमली होती. गोपनिय माहिती व तांत्रिक तपासाच्या अधारे पुणे व नवी मुंबई परिसरात सापळा रचून पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. या तपासात सहा. पोलीस आयुक्त अजय कदम, प्रदिप कन्नलु, रविंद्र गिड्डे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजयकुमार लांडगे, कोंडीराम पोपरे, निवृती कोल्हटकर, संदिपान शिंदे, शिरिष पवार, विजय कादबाने, सहा पोलीस निरिक्षक राहूल राख, रूपेश नाई, राजेश गज्जल, सुधीर निकम, विजय चव्हाण, संदिप गायकवाड, व इतर पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली.